स्वच्छता विभागाकडून विल्हेवाट ; डॉल्फिनचे मृत्यू चिंतेचा विषय…
मालवण, ता. २८ : शहरातील चिवला वेळा येथील समुद्रकिनारी आज सकाळी मृतावस्थेतील कुजलेला सुमारे सहा फूट लांबीचा डॉल्फिन मासा सापडला. या मृत डॉल्फिन माशामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याची माहिती नागरिकांनी नगरपालिका प्रशासनास देताच या मृत डॉल्फिनची नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने विल्हेवाट लावली.
पर्यटकांचा पसंतीचा समुद्र किनारा असणाऱ्या येथील चिवला वेळा लगतच्या समुद्रात जलपर्यटनाबरोबरच पर्यटकांना डॉल्फिन दर्शनाचाही आनंद लुटता येतो. चिवला वेळा समुद्रात डॉल्फिन मासा दिसत असल्याने पर्यटक आवर्जून या किनाऱ्याला भेटी देतात. सध्या कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे येथील जलपर्यटन बंद असून पर्यटकही नाहीत. या किनाऱ्यावर आज सुमारे सहा फूट लांबीचा डॉल्फिन मृतावस्थेत आढळून आल्याने समुद्रप्रेमींमधून चिंता व्यक्त करण्यात आली. या डॉल्फिनचा मृत्यू बऱ्याच दिवसापूर्वी झाला असण्याची शक्यता वर्तविली जात होती. हा मृत डॉल्फिन कुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे चिवलाची वेळ भागात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली होती.
वर्षभरापूर्वी सिंधुदुर्गातील अनेक किनाऱ्यांवर मृत डॉल्फिन आढळून आले होते. त्यानंतर आता आढळून आलेल्या या डॉल्फिनचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. मालवण नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी या मृत डॉल्फिनची योग्य ती विल्हेवाट लावली.