सिंधुदुर्गात अडकलेल्या २५ ऊसतोड कामगारांना मुळगावी जाण्यास परवानगी….

129
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.२८: लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यांच्या सीमा बंद झाल्यामुळे ऊसतोड कामगार जिल्ह्यांमध्ये अडकले आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून २५ ऊसतोड कामगारांना त्यांच्या बीड जिल्ह्यातील परळी या मुळ गावी जाण्यास परवानगी देणारे आदेश जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिले आहेत.
याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील सहकारी साखर कारखाना लि. वेसरफ ता. गगणबावडा यांनी साखर आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. तसेच या कामगारांसोबत एक ड्रायव्हर व ट्रक मालक यांचाही समावेश आहे.
या सर्व कामगारांची व ट्रक मालक व चालक यांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली असून त्यांच्यामध्ये न्युमोनिया किंवा तत्सम कोणतीही लक्षणे नाहीत. या विषयीचे प्रमाणपत्रही सोबत आहे. सबंधीत कामगारांना पुढील अटी व शर्तींनुसार परवानगी देण्यात आली आहे. साखर कारखान्याच्या संचालकांनी संबंधीत वाहन सोडण्यापूर्वी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून त्याची तपासणी करून घ्यावी, वाहनातील व्यक्ती व वाहन क्रमांकाचा उल्लेख अंतिम यादीमध्ये करावा व ही यादी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व सर्व संबंधित जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक व गावांचे सरपंच यांना पाठवावी. साखर कारखान्याचे संचालक, नोडल ऑफिसर सहकारी विभाग यांनी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून वाहनाचा प्रवास मार्ग निश्चित करुन घ्यावा. जिल्हाधिकारी यांनी वाहनांच्या हलचालीबाबद निर्देश दिल्यानंतर गाड्या सोडण्यात याव्यात व मार्गावरील सर्व जिल्हाधिकारी यांना कळवावे. कामगारांची वाहतूक राज्य महामंडळ किंवा खाजगी बसमधूनच करावी. कामगारांसोबतचे साहित्य व जनावरे यांची वाहतूक प्रमाणित केलेल्या ट्रक किंवा ट्रॅक्टरमधून करण्यास हरकत नाही. ट्रक किंवा ट्रॅक्टरमधून चालक, वाहक किंवा अत्यावश्यक व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्ती, कामगार प्रवास करणार नाहीत याची सर्व जबाबदारी संबंधित कारखाना व्यवस्थापनाची राहील. ऊसतोड कामगारांची व त्यांच्या कुटुंबियांची वैद्यकीय प्रमाणपत्र जतन करून ठेवावीत व त्याची एक प्रत प्रवासादरम्यान त्यांना उपलब्ध करून द्यावी. ती संबंधित गावच्या सरपंचांना देवून कार्यवाही करावी. ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांची यादी ते ज्या जिल्ह्यात जाणार आहेत त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, तहसिलदार व पोलीस विभाग यांच्याकडे सादर करावी. प्रवासादरम्यान या सर्व कामगारांची व त्यांच्या कुटुबिंयांची जेवणाची व पिण्याच्या पाण्याची सोय संबंधित कारखान्याने करावी. ऊसतोड कामगार व त्यांचे कुटुबिंयांना मूळ गावी प्रवेश देण्याची जबाबदारी सरपंचांची राहील. तसेच कामगार मुळ गावी पोहचल्याचे सरपंचांचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्याकडे तसेच संबंधीत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावे. कार्यकारी संचालक यांनी प्रमाणित केलेली यादी प्रवास करणाऱ्या वाहनासोबत ठेवण्यात यावी. वाहतूक व प्रवासादरम्यान सुरक्षीत शारिरीक अंतर राखण्यात यावे. मान्यता दिलेल्या यादीतील वाहतूक आराखड्यानुसार संबंधित जिल्ह्यात वाहतूकीची परवानगी देण्यात आली आहे. कारखान्यांनी त्यांचे किती कामगार कोणत्या जिल्ह्यात मळुगावी परतले याची संख्या व सुरक्षितपणे पोहचल्याबाबतचा अहवाल साखर आयुक्त यांच्यामार्फत शासनास सादर करावा. या अटी व शर्तींचा भंग केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियन 2005 व इतर कायदेशीर तरतुदीप्रमाणे संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी दिले आहेत.