वैभववाडी
गगनबावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याकडून जिल्ह्यातील ऊस शेतकऱ्यांच्या खात्यात ५ कोटीची देयके ३० एप्रिलपर्यंत जमा होणार अशी माहिती कारखाना प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.
या निर्णयामुळे लाँकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोनाच्या संकटात ऊस शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी चालू हंगामातील ऊस उत्पादनाची रक्कम तात्काळ द्या असा आग्रह कारखाना प्रशासनाकडे धरला होता. त्याचबरोबर डॉ. डी. वाय. पाटील कुटुंबीय व नारायण राणे यांचे मैत्रिपूर्ण संबंध सर्वज्ञात आहे. या दिलासादायक बातमीबद्दल मतदारसंघाचा आमदार व शेतकऱ्यांच्या घरातील सदस्य या नात्याने मी कारखाना प्रशासन व मंत्री आदरणीय सतेज उर्फ बंटी पाटील यांचे मनापासून आभार मानतो.असे पत्रकारांशी बोलताना आ. नितेश राणे यांनी सांगितले.
हा कारखाना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचा कारखाना आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कारखाना व शेतकऱ्यांच्या मधील दुवा म्हणून मी नेहमी प्रयत्नशील राहील असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.