Wednesday, January 15, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यारोणापाल मधील बागायतदारांकडून विज अधिकारी धारेवर...

रोणापाल मधील बागायतदारांकडून विज अधिकारी धारेवर…

ग्रामस्थांचा घेराव;नुकसान भरपाई तात्काळ देण्याची केली मागणी…

बांदा,ता.२८:  रोणापाल मळी क्षेत्रात दोन दिवसांपूर्वी आग लागून तीन एकरावरील काजू व अन्य झाडे जळाली होती. सलग तिसऱ्या वर्षी याठिकाणी स्पार्किंगमुळे आग लागण्याची घटना घडली. नुकसान भरपाईची कागदपत्रे मुख्य कार्यालयात वेळेवर पोहचत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे असे सांगत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी बांदा वीज वितरणचे कनिष्ठ अभियंता अनिल यादव यांना आज धारेवर धरले. तसेच अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळेच काजू बागायतींचे नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
जिल्हा प्रभारी सहायक विद्युत निरीक्षक दुर्गेश सबनीस यांनी सदर घटनेची दखल घेऊन पाहणी केली. यावेळी रोणापाल सरपंच सुरेश गावडे, उपसरपंच पप्या केणी, माजी सरपंच उदय देऊलकर, निगुडे तलाठी नारायण घृणात, कृषी अधिकारी यशवंत सावंत, नुकसानग्रस्त शेतकरी कृष्णा केणी, प्रकाश गावडे, प्रकाश शेगडे वायरमन नारायण मयेकर उपस्थित होते.
शेतकरी कृष्णा केणी यांच्या बागेला २०१८ साली आग लागली होती. कागदपत्रांची पुर्तता करूनही अद्याप त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. काजू कलमे जळाल्याने बागायतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला. पंचनामा फक्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यापुरताच केला जातो. भरपाई कोणी दिली आणि कोणी घेतली अशाप्रकारे वीज अधिकारी गाफिल राहतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या भावनांशी न खेळता जबाबदारीने काम पार पाडावे, असे नुकसानग्रस्त शेतकरी प्रकाश गावडे म्हणाले. तर आग लागून दोन दिवस न होताच काल रात्रो त्याच ठिकाणी वाहिन्यांचा एकमेकांना स्पर्श होऊन स्पार्क झाले. वीज अधिकाऱ्यांनी सर्व लाईनचा सर्वे करून कमकुवत झाल्या तारा तात्काळ बदलाव्यात.
शेतकऱ्यांनी प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर अनिल यादव म्हणाले, सर्व प्रकरणे मंजुरीसाठी मुख्य कार्यालयात पाठविली आहेत. परंतु त्याच ठिकाणी असलेले जिल्हा प्रभारी सहायक विद्युत निरीक्षक दुर्गेश सबनीस यांनी आपल्याजवळ अजून एकही प्रकरण आले नसल्याचे सांगितले. त्यामुळे वीज विभागातच सावळागोंधळ असल्याचा आरोल सरपंच सुरेश गावडे यांनी केला.
रोणापालमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागलेल्या चारही प्रकरणांच्या कागदपत्रांची पूर्तता आठ दिवसांत करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य भरपाई देण्यात येणार असून यापुढे सतर्कता बाळगण्यात येणार असल्याचे, अभियंता यादव यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments