सिंधुदुर्गनगरी, ता. २९ : चार दिवसापूर्वी मुंबईहून कुडाळ तालुक्यातील एका दुर्गम गावात आलेली १५ वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ग्रीन झोन कडे वाटचाल करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठा धक्का बसला आहे.मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने कुडाळ तालुक्यातील सह्याद्री पायथ्याशी असलेल्या एका गावात एक कुटुंब दाखल झाले होते. या सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच स्वॅब नमुने घेण्यात आले होते. यात पंधरा वर्षीय मुलीचा अहवाल कोरोना “पॉझिटिव्ह” आला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
याबाबत जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला असता, पत्रकार परिषद घेऊन अधिकृत माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.