वीज पुरवठा ठप्प; ठिकठिकाणी झाडे कोसळली
कणकवली, ता.29 ः सायंकाळी साडेचार नंतर आलेल्या अवकाळी पावसाने आज नांदगांव, कासार्डे, खारेपाटण परिसराला झोडून काढले. सोसाट्याचा आणि त्या पाठोपाठ आलेल्या मुसळधार सरींनी अनेक ठिकाणी झाडे कोसळली. तर सायंकाळी उशिरापर्यंत वीज पुरवठा देखील ठप्प झाला होता. सुमारे एक तास सुरू असलेल्या या पावसाने महामार्गालगतची माती वाहून गेल्याने गावात जाणार्या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
सायंकाळच्या सत्रात झालेल्या अवकाळी पावसासोबत जोरदार वारे असल्याने अनेक घरांचे पत्रे आणि कौलेही उडाली. तर वीज तारांवर वृक्ष आणि फांद्या कोसळून पडल्याने तालुक्यातील वीज पुरवठा ठप्प झाला होता. जोरदार पावसाचा फटका महामार्ग चौपदरीकरण कामालाही बसला. खारेपाटण पसिरातील महामार्गालगतच्या संरक्षक भिंतीची माती वाहून रस्त्यावर आली होती. तर महामार्गावरून गावात जाणार्या रस्त्याची माती वाहून गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. आजच्या अवकाळी पावसामुळे आंबा आणि केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक बागांमधील आंबा फळे गळून पडली तर केळी मोडल्याने बागायतदारांना मोठा फटका बसला. दरम्यान हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.