परिमल नाईक; अन्यथा पुनरावृत्ती झाल्यास,जिल्हावासीयांना धोक्याची घंटा ठरेल…
सावंतवाडी ता,२९: लॉकडाउनच्या काळात चोरटया पध्दतीने जिल्ह्यात येणार्या विरोधात प्रशासनाने कारवाई करावी,अन्यथा सर्व सामान्य नागरीकांमध्ये प्रशासकीय धाक राहणार नाही,अशी भूमिका सावंतवाडी पालिकेचे आरोग्य सभापती तथा वकील परिमल नाईक यांनी मांडली आहे .दरम्यान अशा प्रकारे विनापरवाना जिल्हयात येणार्या मुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होवू शकतो त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेणे आता काळाची गरज आहे, असे ही त्यांनी म्हटले आहे.
याबाबत त्यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, सिंधुदूर्ग जिल्हा ग्रीन झोनकडे वाटचाल करीत असताना, मुंबईतून या ठीकाणी आलेली एक मुलगी पॉझीटिव्ह आढळून आली आहे. दुसरीकडे अद्याप पर्यत मोठया प्रमाणात अनेक लोक या ठीकाणी चोरट्या पध्दतीने येत आहे. हा सर्व प्रकार लक्षात घेता, त्यांच्याकडुन सुरू असलेले प्रयत्न हे जिल्ह्याच्या दृष्टीने योग्य नाही. संबधितांवर कायद्याचा धाक राहणे गरजेचे आहे, नाही तर त्याची वेळोवेळी पुनरावृत्ती होत राहणार आहे. त्यामुळे याची दखल जिल्हा प्रशासनाने घ्यावी, असे श्री नाईक यांनी म्हटले आहे.