हरी चव्हाण ; सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी संबंधित शासकीय संस्थांना सूचना द्याव्यात…
मालवण, ता. २९ : अत्यावश्यक सेवेमधील कंत्राटी कर्मचार्यांना किमान वेतन वेळच्यावेळी मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाचे सदस्य कामगार प्रतिनिधी हरी चव्हाण यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
आज कोरोनासारख्या महामारीच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असताना बरेच कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून देश कोरोना महामारीतून मुक्त करण्यासाठी लढा देत आहेत. यात प्रामुख्याने आरोग्य, सफाई कामगार, पोलिस यंत्रणा तत्सम नागरिक काम करत आहेत. प्रामुख्याने शासकीय रुग्णालयात, नगरपरिषद, नगरपंचायत व अन्य शासकीय कार्यालयांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणार्या कर्मचार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
हे कर्मचारी आपल्या नियमित शासकीय किमान वेतन कायद्यानुसार देय्य ठरणार्या किमान वेतनापासून व त्यांना आवश्यक सेवा सुविधांपासून वंचित राहणार नाहीत. तसेच त्यांचे वेतन थकीत राहणार नाही यासाठी आपल्या स्तरावर संबंधित शासकीय संस्थांना तत्काळ कार्यवाहीसाठी पत्रव्यवहार करून सूचना द्याव्यात अशी मागणीही श्री. चव्हाण यांनी केली आहे.