नागरिकांच्या हितासाठीच कारवाई- कांदळगावकर ; नगराध्यक्षांच्या हुकूमशाहीस आमचा विरोध- वराडकर…
मालवण, ता. ३० : परजिल्ह्यातील भाजीपाला, फळविक्रीस बंदी असतानाही फळविक्री सुरू असल्याने आल्याने नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी नगरपालिका अधिकार्यांसह कारवाईस सुरवात केली. या कारवाईवर उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी आक्षेप घेतल्याने भर बाजारपेठेतच त्यांच्यात जुंपल्याचे दिसून आले. नगराध्यक्षांच्या कारवाईनंतरही फळविक्रेत्यांनी आपली विक्री सुरू ठेवल्याचे तर सूचना करूनही मुख्याधिकार्यांनी फळविक्रेत्यांवर कारवाई न केल्याचे दिसून आले.
दरम्यान फळविक्रेत्यांनी फिरून फळविक्री करण्याचे आदेश असतानाही ते बाजारपेठेत गाड्या लावून फळविक्री करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे संबंधितांवर मुख्याधिकार्यांनी कारवाई न केल्यास त्यांच्याविरोधात पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
परजिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर पालिकेने शहरात परजिल्ह्यातील भाजीपाला, फळविक्रीस पूर्णतः बंदी घातली होती. अशातच आज शहरातील बाजारपेठेत फळविक्रेत्यांनी गाड्या लावून फळविक्री सुरू ठेवली होती. याची माहिती मिळताच नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती यतीन खोत यांच्यासह पालिकेच्या अधिकार्यांनी फळविक्रेत्यांवर कारवाई करण्यास सुरवात केली. फळविक्रेत्यांनी आरोग्य तपासणी केली नसल्याचे तसेच हॅण्डग्लोज वापरले जात नसल्याचे दिसून आले. परजिल्ह्यातील फळविक्रेत्यांनी सर्व बाबींची तपासणी करून एका जागेवर विक्री न करता फिरून फळविक्री करावी अशा सूचना नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी केल्या.
नगराध्यक्षांकडून फळविक्रेत्यांवर कारवाई होत असल्याचे दिसून येताच उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. फळविक्रेते हे सामाजीक अंतर ठेवून फळविक्री करत आहेत. त्यांना मुख्याधिकार्यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे दमदाटी, हुकुमशाहीने नगराध्यक्षांनी त्यांना रोखू नये अशी भूमिका मांडली. या कारवाईवरून नगराध्यक्ष कांदळगावकर व श्री. वराडकर, श्री. आचरेकर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. भर बाजारपेठेतच सत्ताधारी, विरोधकांमध्ये जुंपल्याने अन्य नागरिकांनी त्याठिकाणी सामाजीक अंतर ठेवत गर्दी केल्याचे दिसून आले. माजी नगराध्यक्ष आचरेकर, श्री. वराडकर यांनी फळविक्रेत्यांना तुम्ही फळविक्री सुरू ठेवा असे सांगितल्याने नगराध्यक्षांच्या कारवाईनंतरही फळविक्री सुरू ठेवल्याचे दिसून आले.
नगराध्यक्ष महेश कांदळगावकर म्हणाले, शहराच्या हिताच्या आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातूनच परजिल्ह्यातील भाजीपाला, फळविक्रीस बंदी घालण्याचा निर्णय सर्व नगरसेवकांनी घेतला होता. मात्र मुख्याधिकार्यांनी स्वतःच्या अधिकारात फळविक्रेत्यांना विक्रीसाठी परवानगी दिली आहे. विक्रेत्यांची काळजी आम्हालाही आहे. त्यामुळे ३ मे नंतर या विक्रेत्या संदर्भात योग्य तो निर्णय घेऊ असे आपण उपनगराध्यक्षांना सांगितले. फळविक्रेत्यांनी एका ठिकाणी गाडी न लावता फिरून फळविक्री करावी असे आदेश आहेत. त्यामुळे संबंधित फळविक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या सूचना मुख्याधिकार्यांना दिल्या आहेत. त्यांच्याकडून कारवाई न झाल्यास त्यांची पालकमंत्र्यांकडे तक्रार करू अशी भूमीका श्री. कांदळगावकर यांनी मांडली.
फळविक्रेत्यांवर कारवाई करण्याचा नगराध्यक्षांना कोणताही अधिकार नाही. शहरात कारवाई करण्याचे अधिकार, मुख्याधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षकांनाच आहेत. लोकांना विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय घ्यायला हवा होता. ते विक्रेत्यांना दमदाटी करत असल्यानेच त्यांच्या या कारभारास आमचा विरोध असल्याची भूमिका उपनगराध्यक्ष वराडकर यांनी मांडली. आज सकाळी मुख्याधिकारी, पोलिस निरीक्षकांनी बाजारपेठेत फिरून पाहणी केली. त्यांना अयोग्य वाटले असते तर त्यांनी फळविक्रेत्यांवर कारवाई केली असती. मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. नगराध्यक्षांनी मुख्याधिकार्यांची पालकमंत्र्यांकडे खुशाल तक्रार करावी. आमचेही त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. पालकमंत्र्यांवर आमचा विश्वास असल्याने ते योग्यच निर्णय घेतील असे श्री. वराडकर यांनी स्पष्ट केले.