पालकमंत्री उदय सामंत व प्रशासनाच्या बैठकीत निर्णय ; नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची माहिती…
मालवण, ता. १ : मालवण शहरातील हॉटेल, आईस्क्रीम पार्लर, हार्डवेअर दुकाने खुली करण्यासाठी वेळेचे व नियमांचे बंधन घालून परवानगी मिळणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आज जिल्हास्तरावर झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार वैभव नाईक, अन्य शहरातील अधिकारी, लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. शहरी भागात हा दिलासा मिळणार आहे. तरी संबंधित दुकान मालकांनी नगरपालिकेशी संपर्क करावा असे आवाहन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले आहे.
हॉटेल सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत खुले करून खाद्यपदार्थ घरपोच सेवेबरोबर काउंटर पार्सल सेवाही सुरू करता येणार आहे. आईस्क्रीम पार्लरही दुपारी २ ते ६ या कालावधीत काउंटर पार्सल सुविधेद्वारे सुरू करता येणार आहे. पावसाळा कालावधी लक्षात घेता काही साहित्य खरेदीसाठी हार्डवेअर दुकाने प्रत्येक दुकानांना दिवस ठरवून दुपारी २ ते ६ या वेळेत सुरू करता येतील. मात्र यासाठी पालिका प्रशासनाची परवानगी, कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारी उपाययोजना व सोशल डिस्टनस ही बाब महत्वाची असणार आहे.
काही दुकाने खुली होणार असली तरी ज्या दुकानांना परवानगी नाही त्या दुकानात एखाद्यावेळी मालक अथवा कर्मचारी साफसफाई अथवा अन्य कामानिमित्त आला असेल तर त्यावर थेट कारवाईचा बडगा न उगरता खात्री करून कारवाई करावी. अन्यथा कारवाई करू नये. अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी प्रशासनास दिल्या. याबाबत नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व बांधकाम सभापती यतीन खोत व नगरसेवक मंदार केणी यांनी पालकमंत्री यांचे लक्ष वेधले होते.
परजिल्ह्यातून भाजीपाला व फळे शहरात विक्रीसाठी येतात त्यांना पालिकेने निर्बंध घातले. मात्र पुन्हा फळविक्री सुरू झाली. तरी याबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी पालिकास्तरावर एकत्र बैठक घेऊन निर्णय घ्यावा. अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. तर परजिल्ह्यातून मालवणात जी अत्यावश्यक सेवा व कृषी स्वरूपात चारचाकी वाहनांची वाहतूक होते त्यातील साहित्याची, कृषीमालाची तसेच चालक, मालक व मदतनीस यांची नोंद मालवण शहराचे प्रवेश असलेल्या देउळवाडा व कोळंब पूल मार्ग याठिकाणी व्हावी. नोंद न ठेवणाऱ्या वाहनांवर कारवाई व्हावी. अशी मागणी नगराध्यक्ष यांनी केली. त्यालाही पालकमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
सिंधुदुर्ग ग्रीन झोनमध्ये आला आहे, त्यामुळे लॉकडाऊन मध्ये थोडी शिथिलता येण्याची शक्यता आहे. पण हाच खरा कसोटीचा काळ आहे. तरी नागरिकांनी आता पर्यंत जसे सहकार्य केले, संयम ठेवला तसाच यापुढेही ठेवावा. असे आवाहन नगराध्यक्ष श्री. कांदळगावकर यांनी केले आहे.