कोरोना मुळे जत्रौत्सवातील दशावतारी नाटक न होताही दशावतार मंडळाला दिले मानधन…
वेंगुर्ले.ता,०२: दरवर्षी प्रमाणे वैशाख शु ६ या तिथी प्रमाणे शिरोडा शेटयेडोंगरी येथे श्री देवी महालक्ष्मी देवस्थान यांनी जत्रौत्सव निमित्त धार्मिक कार्यक्रम व दशावतारी नाटय प्रयोग करण्याचे ठरविले होते. परतू अचानक देशामध्ये उद्भवलेल्या कोरोना व्हायरस प्रादुर्भावामुळे मंदिरातीलनधार्मिक कार्यक्रम केले, मात्र परंपरा प्रमाणे दशावतारी नाटय प्रयोग होऊ शकला नाही. तरीही देवस्थान तर्फे दशावतार मंडळाला नाटकाचे मानधन देण्यात आले.
कोरोना मुळे सध्या कुठचेच कार्यक्रम होत नाहीत. जत्रौत्सव निमित्त श्री महालक्ष्मी देवीवर शेटये कुटुंबाच्यावतीने ब्राम्हणाहस्ते अभिषेक करण्यात आला व सर्व शेटये कुटुंबातील सर्व सदस्यांना घरी राहाण्याचे देवस्थान वतीने आवाहन करण्यात आले होते. त्यांना व्हाॅटसपच्या व फेसबुकच्या माध्यमातून श्री देवी महालक्ष्मी चे दर्शन देण्यात आले. मात्र सध्याच्या परिस्थितीत नाटकं होत नसल्याने दशावतारी नाटय मंडळातील दशावतारी कलाकाराची आर्थिक ओढाताण होत आहे. या कारणाने जत्रौत्सवाचे दशावतारी नाटक रद्द झाले असले तरी देवस्थानने दशावतार कलाकारासाठी मानधन देण्याचे ठरवले. त्याप्रमाणे दरवर्षी जत्रौत्सव निमित्त दशावतार नाटक सादर करणारे मामा मोचेमाडकर पारंपारिक दशावतार मंडळाचे मालक अमोल मोचेमाडकर यांना श्री देवी महालक्ष्मी देवस्थान वतीने श्री हरिश्चंद्र(बाळा) शेटये यांच्या हस्ते मानधन दिले. अशा प्रकारे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमी वर इतर देवस्थानने अशा प्रकारचा उपक्रम राबवून दशावतार नाटय मंडळातील कलाकारांना हातभार लावावा असे देवस्थान वतीने आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान या देवस्थानच्या स्तुत्य उपक्रमाचा शिरोडा पंचक्रोशीमध्ये विशेष अभिनंदन होत आहे.