उदय सामंत; आज सायंकाळपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता…
सावंतवाडी ता.०३: मुंबई-पुण्यातील चाकरमान्यांना कोकणात आणण्याबाबत संभ्रमावस्था आहे.केंद्र शासनाकडून काय निर्णय घेण्यात आला,हे अद्यापपर्यंत निश्चित झालेले नाही.आज सायंकाळपर्यंत निर्णय स्पष्ट होईल.त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल,अशी भूमिका पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा ग्रीन झोन होण्याच्या वाटेवर आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.परंतु भविष्यात चाकरमानी आल्यास येथील लोकांनी योग्य ती खबरदारी घेणे काळाची गरज आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत,संजय पडते, रुपेश राऊळ,सागर नाणोसकर,गुणाजी गावडे,शब्बीर मणियार,अनारोजीन लोबो, भारती मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री.सामंत म्हणाले,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात जिल्हावासीयांनी अपेक्षित सहकार्य केले आहे.त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले,दरम्यान सिंधुदुर्गाची वाटचाल ही ग्रीन जॉनकडे जाण्याच्या दिशेनेच आहे.त्यासाठी शासन स्तरावर आम्ही पाठपुरावा करीत आहोत,आणि येत्या आठ दिवसात आपण ग्रीन झोनमध्ये असू,असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, पावसाळा जवळ येत आहे.त्यामुळे पाणीटंचाईची कामे सुरू करण्याबाबत आपण संबंधितांना सूचना दिल्या आहेत.आणि ती सुद्धा लवकरच पूर्ण होतील असे त्यांनी सांगितले. तर या ठिकाणी अडकलेल्या परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.मात्र त्यांना त्याठिकाणी सोडण्यासाठी येणारा प्रवास खर्च हा लाखो रुपयांच्या घरात जात आहे.त्यामुळे तो खर्च सद्यस्थितीत शासनाला परवडणारा नाही,तर येणारा खर्च भरण्यास ते सक्षम आहेत का? हे प्राथमिक रित्या पहावे लागणार आहे.असेही त्यांनी सांगितले.