विर्डी,तळेखोल व आयी ग्रामस्थांचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना निवेदन…
दोडामार्ग ता.०३: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात गोवा-सिंधुदुर्ग हद्दीवरील नागरिकांना गोव्यात ये-जा करण्यास मुभा मिळावी,अशी मागणी विर्डी,तळेखोल व आयी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे.याबाबत त्यांनी श्री.सावंत यांना निवेदन दिले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटल्या प्रमाणे,गोव्याच्या सीमेलगत राहणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्गमधील विर्डी,तळेखोल,आयी व दोडामार्ग तालुक्यातील इतर गावातील नागरिक हे कामधंदा,नोकरी,शिक्षण,बाजार,वैद्यकीय सेवा आदि साठी पूर्णपणे गोव्यावर अवलंबून आहेत.परंतु लॉकडाउन मुळे गोवा व सिंधुदुर्ग जिल्हा यांनी सर्व सीमा सील केल्याने गेले चाळीस दिवसांपासून या लोकांचा गोवा राज्यातील संपर्क तूटला आहे.गेले चाळीस दिवस हे लोक अत्यंत कठीण परिस्थितीत असून अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू,भाजीपाला यासाठी गोव्यावर अवलंबून आहेत.
तसेच गंभीर जखमी किंवा आजारी व्यक्ती यासाठीही उपचारासाठीही गोव्यावर अवलंबून असून आताच्या परिस्थितीत गोव्यात औषध उपचारास नेण्यास सुद्धा मज्जाव केला जात आहे.यामुळे लोकांचे हाल होत आहेत. त्यामुळे निदान काम धंदा नोकरी व्यवसाय तसेच शिक्षण व आपत्कालीन प्रसंगी गोव्यात ये जा करण्यास परवानगी द्यावी.आवश्यक असल्यास ओळखपत्र तपासून तसेच वैद्यकीय चाचणी घेऊन प्रवेश देण्याबाबत गोवा सरकारने सहानुभूती पूर्वक विचार करावा अशी विनंती आयी पंचक्रोशीतील नागरिकांनी गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना निवेदनाद्वारे केली आहे.