लॉकडाऊन शिथिल झाल्याने ग्राहकांची धाव ः ठराविक दुकाने सुरू
कणकवली, ता.4 ः आजपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली जात असल्याचे केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केले होते. त्यामुळे कणकवली बाजारपेठेत ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, स्टेशनरी आदींची ठराविक दुकानेच उघडण्यात आली होती. दरम्यान बाजारपेठेत गर्दी होत असल्याने पोलिस प्रशासनाला वारंवार हस्तक्षेप करावा लागत होता.
आजपासून सर्व दुकाने उघडणार असल्याचे वृत्त दूरचित्रवाहिन्यांवरून दाखविले जात असल्याने कणकवली बाजारपेठेत सकाळी आठ वाजल्यापासूनच ग्राहकांनी गर्दी केली होती. याखेरीज ग्रामीण भागातील विक्रेत्यांनीही बाजारपेठ दुतर्फा दुकाने थाटली होती. वाढत्या गर्दीमुळे सर्वच दुकानांसमोर सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडाला होता. ही बाब लक्षात येताच पोलिसांनी हस्तक्षेप करून गर्दी पांगविण्याचा प्रयत्न केला. तसेच आपापल्या दुकानात गर्दी होणार नाही, सोशल डिस्टन्सींगचे काटेकोर पालन होईल याबाबतची दक्षता घेण्याचे निर्देश पोलिस प्रशासनाकडून दिले जात होते. तर बाजारपेठेतील गर्दी टाळण्यासाठी विक्रेत्यांनाही बाजारातून हटविण्यात आले.