राजेंद्र म्हापसेकर; आठ दिवसात काम सुरू न केल्यास दंड आकारण्याच्या सूचना…
ओरोस ता.०४:
देवगड मधील पशुवैद्यकीय दवाखान्याचे काम घेवूनही दोन वर्षे सुरु न करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस काढा,तसेच आठ दिवसात काम सुरु न केल्यास दंड आकारा,असे आदेश जि.प उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी आजच्या पशुसंवर्धन समिती सभेत दिले.
जिप पशुसंवधर्न व दुग्ध विकास समितीची तहकूब सभा येथील बॅ नाथ पै समिती सभागृहात सभापती तथा जिप उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दिलीप शिंपी, सदस्य स्वरूपा विखाळे, मनस्वी घारे, अनुप्रिती खोचरे, तालुका पशुधन अधिकारी आदी उपस्थित होते.
देवगड पशु दवाखाना इमारतीच ५ लाख रुपयांचे काम मंजूर आहे. काम मंजूर होवून दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र हे काम घेणाऱ्या ठेकेदाराने हे काम अद्याप सुरु केलेले नाही. त्यामुळे हे काम सुरु करण्याबाबत ठेकेदाराला नोटिस काढून आठ दिवसांची मुदत दया. या मुदतीत काम सुरु न झाल्यास ठेकेदाराला दंड करा असे आदेश जिप उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांची आजच्या सभेत दिले.
रिक्त पदांचा आढावा घेतला असता पशुविकास अधिकाऱ्यांची २५ पदे मंजूर असून १२ भरलेली आहेत तर १३ रिक्त आहेत. पशुधन पर्यवेक्षक ५ भरलेली तर १० रिक्त, सहाय्यक पशुधन अधिकारी १४ भरली तर ५ पदे रिक्त असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.