सिंधुदुर्गनगरी ता.०४: कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता मिशनतर्फे जिल्ह्यातील ग्रामपातळीवर काम करणाऱ्या ८०३ स्वच्छताग्रहींची व स्वयंसेवकांना ऑनलाईन कॉन्फरसिंगद्वारे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती पाणी व स्वच्छता मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश जोधंळे यांनी दिली.राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्व जिल्हापरिषद स्तरावर प्रशिक्षण देण्यात येत आहे.त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ‘स्वच्छ भारत मिशन’ (ग्रामीण) अंतर्गत कार्यरत असलेल्या स्वच्छतागृही व इतर ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थितीतांना मार्गदर्शन कोलो. जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधिक्षक कार्यालय व जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या माध्यमातून अनेक उपक्रम ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येत आहेत. कोरोना विरुद्धच्या लढाईत स्वच्छताग्रही सक्रिय करण्यात आले असून यांच्या माध्यमातून कोरोनाबाबत गाव पातळीवर ग्रामपंचायत स्तरावर प्रभावीपणे जन जागृती राबविण्यात येत आहे.
स्वच्छताग्रहीना देण्यात आलेल्या प्रशिक्षणा दरम्यान कोविड संकल्पना, श्वसन संस्थेची स्वच्छता, शारिरीक अंतर ठेवणे, मास्कचा वापर करणे, गावपातळीवर काम करताना घ्यावयाची काळजी, पाणी साठवण व स्त्रोत स्वच्छता, शौचालय वापर, विलगिकरण म्हणजे काय, कोविड-19 समज व गैरसमज, संवाद उपक्रम आदींविषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, पाणी गुणवत्ता निरिक्षक निलेश मठकर, क्षमता बांधणी तंज्ञ रुपाजी किनळेकर, मनुष्यबळ विकास सल्लागार तज्ज्ञ इंदिरा परब, माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ प्रवीण काणकेकर आदींनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संतोष पाटील व विषयतज्ज्ञ उपस्थित होते.