सुशांत नाईक यांची टीका ः वर्दीला हात घातल्याने कणकवलीत कडक कारवाई
कणकवली, ता.5 ः कणकवली नगराध्यक्षांची गाडी जप्त होणे ही संपूर्ण कणकवलीवासीयांसाठी शरमेची बाब आहे. आज गाडी जप्त केली उद्या नगराध्यक्षांची खुर्चीही पोलिस प्रशासन जप्त करू शकते अशी टीका नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे नगरसेवक सुशांत नाईक यांनी आज केली. तसेच कोरोनामध्ये चांगली कामगिरी करणार्या पोलिसांच्या वर्दीला हात घालण्याचा प्रयत्न नगराध्यक्षांनी केला होता. त्यानंतर कणकवलीत कडक कारवाईची अंमलबजावणी झाली. यात शेकडो दुचाकी जप्त करण्यात आल्या. तर अनेकांवर दंडात्मक कारवाई झाली. नगराध्यक्षांच्या चुकीचा सर्वसामान्यांचा असा फटका बसला असेही श्री.नाईक म्हणाले.
येथील विजयभवन मध्ये श्री.नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगरसेवक रूपेश नार्वेकर, कन्हैया पारकर, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, सुजित जाधव, सचिन सावंत आदी उपस्थित होते.
श्री.नाईक म्हणाले, पोलिसांच्या वर्दीला हात घातल्यानंतर कणकवली नगराध्यक्षांवर गुन्हा दाखल झाला आहे. सध्या ते फरार आहेत. तरीही ते काल (ता.4) तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे बैठक संपल्यानंतर पोलिसांनी नगराध्यक्षांची गाडी जप्तीची कारवाई केली. पुढील काळात नगराध्यक्ष पोलिसांत हजर न झाल्यास त्यांची खुर्ची देखील पोलिस जप्त करू शकतात.
श्री.नाईक म्हणाले, कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात सध्या कणकवली शहराला वाली उरलेला नाही. नगराध्यक्ष फरार आहेत तर मुख्याधिकारी नगरपंचायतीमध्ये येतच नाहीत. त्यामुळे नगरपंचायतीवर प्रशासन नेमावा अशी मागणी आम्ही पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.