ग्राहक पंचायत महाराष्ट्रची मागणी…
वैभववाडी,ता.०५: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, ग्राहकांची जीवनावश्यक वस्तू खरेदीत मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने आवश्यक वस्तू कायद्यांतर्गत “ग्राहक मदत कक्ष” तयार करून ग्राहक तक्रारीसाठी मोबाईल संपर्क प्रसिद्ध करावे, तसेच ग्राहक न्यायालये चोवीस तास उघडी ठेवावीत असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोकण विभाग व सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
कोरोनाच्या महामारीत संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा चांगले काम करीत आहे. तथापि, ही यंत्रणा तोकडी पडत असल्याने, नीती आयोगाने अधिकृत केलेल्या ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या कार्यकर्त्यांची मदत घ्यावी, असे नीती आयोगाने सुचविले आहे. असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
ग्राहकांना जीवनावश्यक वस्तू महागड्या वाटेल त्या भावात खरेदी कराव्या लागत आहेत. या कठीण परिस्थितीत मिळेल त्या भावात आणि दर्जात या वस्तू खरेदी कराव्या लागत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
रेशन दुकानात कोणते धान्य कोणाला द्यावे याबाबत प्रचंड गोंधळ असल्याच्या तक्रारी आहेत.
पंतप्रधान धान्य योजनेचा जवळपास फज्जा उडाल्याची स्थिती आहे. त्यामुळे प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन उपाययोजना म्हणून ग्राहक मदत कक्ष स्थापन करावे. अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे कोकण विभाग तथा सिंधुदुर्ग जिल्हा शाखा अध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील, जिल्हा संघटक एकनाथ गावडे, कोषाध्यक्ष संदेश तुळसणकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. तसेच या मागणीची प्रत मा.आयुक्त, कोकण विभाग, जिल्हा पुरवठा आधिकारी व राज्याध्यक्ष ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांना पाठविली आहे.