विक्रांत सावंत; व्हिजन सोडाच,संजू परबांनी व्यापा-यांत भांडणे लावण्याचे काम केले…
सावंतवाडी ता.०६:नगराध्यक्ष संजू परब यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखाच प्रकार आहे.असा टोला शिवसेनेचे विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत यांनी आज येथे लगावला.दरम्यान आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या नगराध्यक्षपदाच्या काळात एक व्हीजन ठेवून शहराचा विकास केला होता.मात्र त्यांच्यावर टीका करणा-या परबांनी व्यापा-यात भांडणे लावण्याचे काम केले,असाही चिमटा त्यांनी काढला.आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत संजू परब यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह आमदार केसरकर यांच्यावर टीका केली होती.त्याला श्री.सावंत यांनी प्रत्युत्तर दिले.याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे.
त्यात म्हटल्याप्रमाणे,पालकमंत्र्यांना त्यांची जबाबदारी दाखविणार्या नगराध्यक्ष परबांनी आमदारकीचे स्वप्न सोडुन नगराध्यक्षपदावर समाधान का मानले,याचे उत्तर द्यावे,पालकमंत्र्यांवर टिका करणे नगराध्यक्ष संजू परब यांना शोभत नाही.आमच्या आमदार दिपक केसरकर यांच्यावर बोलण्याचा परब यांना अधिकार नाही.नगराध्यक्ष असताना केसरकर यांनी एक डोळ्यासमोर व्हीजन ठेवून शहराचा विकास केला.मात्र परब यांच्यासारखे दोन धर्मात व्यापार्यात भांडणे लावून देण्याचे काम केले नाही.
मास्क वाटपावरुन टिका करणार्या परब व त्यांच्या सहकार्यांनी शिवसेनेचा पिंडच समाजसेवेचा आहे,हे विसरू नये,आणि ते आज ज्यांची नावे घेत आहेत.ते त्यांचे नेते शिवसेनेतूनच मोठे झाले आणि राजकारण करू शकले,त्याचा आदर्श शिवसेनेतून राजकारणात प्रवेश केलेल्या परबांनी घ्यावा,असे सावंत यांनी म्हटले आहे.