मालवण, ता. ६ : सिंधुदुर्ग कबड्डी असोसिएशनचे राज्यस्तरीय कबड्डीपटू महेश ऊर्फ डूबा विजय गिरकर (वय-४६) यांचे आज जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. पित्ताशयाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले होते. यात आज सकाळी त्यांचे निधन झाले.
सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी संघाला सन २००३ मध्ये राज्यात तृतीय क्रमांक मिळवून देण्यात त्यांचे मोठे योगदान होते. नारळी पोर्णिमा तसेच अन्यवेळी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात त्यांचे योगदान होते. अनेक नामवंत खेळाडू त्यांनी घडविले. राज्यस्तरीय पंच म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांच्या अकाली निधनाने जिल्ह्याच्या कबड्डी क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, बहिणी, भावोजी असा परिवार आहे. बाजारपेठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.