टपऱ्या, सलून, दुचाकींना बंदीच ;
सकाळी सात ते सायंकाळी सात यावेळतच दुकाने उघडी राहणार
मालवण.ता.०६: कोरोना पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. मात्र लॉकडाउनच्या या तिसऱ्या टप्प्यात ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये उद्योग व्यवसायासाठी काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मालवण शहरातील बाजारपेठही ७ मे पासून सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
बाजारपेठेत रस्त्याच्या एका बाजूची दुकाने एका दिवशी तर दुसऱ्या बाजूची दुकाने दुसऱ्या दिवशी खुली राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा दुकाने वगळता अन्य सर्व दुकानांसाठी सकाळी ७ ते सायंकाळी ७ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. तसेच सोशल डिस्टनस व अन्य खबरदारी उपाययोजनाही बंधनकारक असणार आहेत.
प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण तहसील कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी तहसीलदार अजय पाटणे, मुख्याधिकारी जयंत जावडेकर आदी प्रशासन प्रमुख तसेच नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती यतीन खोत, जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष नितीन तायशेटये, मालवण व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, अशोक सावंत, बाळू अंधारी, हर्षल बांदेकर, रवी तळाशीलकर, अजय शिंदे, मंदार ओरसकर, विनू पारकर यासह अन्य व्यापारी सामाजिक अंतर ठेवून बैठकीस उपस्थित होते.
या बैठकीत बाजारपेठ प्रमुख मार्ग व त्याला जोडणाऱ्या गल्ली मार्गावर असलेली दुकाने एका दिवशी एका बाजूची दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाजूची अश्या स्वरूपात खुली करण्यास एकमत झाले. दुकानमालकांनी खबरदारी उपाययोजना बरोबर ग्राहकांची नाव नोंद ठेवणे बंधनकारक असणार आहे.
शहरात दुचाकींना परवानगी नाही मात्र ग्रामीण भागात दुचाकींना परवानगी आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे शहरात दुचाकीचे पास नाहीत असे ग्राहक, व्यापारी अथवा दुकानातील कर्मचारी हे ग्रामीण भागातून मालवण बाजारपेठ येथे येत असतील तर त्यांनी आपल्या दुचाकी कोळंब, आडारी, वायरी अथवा कुंभारमाठ हद्दीत ठेवाव्यात असेही आवाहन करण्यात आले आहे.
तंबाखू, गुटखा, सुपारी विक्री करणाऱ्या टपऱ्या बंदच राहणार आहेत. त्या बरोबर पान, तंबाखू, गुटखा, सुपारी खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास कारवाई केली जाणार आहे. असेही प्रांताधिकारी यांनी स्पष्ट केले. रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या वडापावच्या गाड्या यांनाही परवानगी देण्यात आली नाही. शहरातील सलून व्यवसायास परवानगी कधी मिळणार असा सवाल अजय शिंदे यांनी उपस्थित केला. यावेळी प्रांताधिकारी म्हणाले शहरातील सलून, स्पा, ब्युटी पार्लर, मसाज सेंटर बंद ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र ग्रामीण भागातील सलून सुरू ठेवण्यास परवानगी आहे. त्यामुळे शासनाकडून शहरातील सलून सुरू करा असे आदेश येत नाहीत तोपर्यंत सलून बंदच राहतील. असे प्रांताधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
शहरातील बाजारपेठ रस्त्यावर गावठी भाजीपाला विक्रीसाठी जे शेतकरी, ग्रामस्थ येतात त्यांनी सकाळी ७ ते ११ या वेळेत व्यवसाय करावा. असेही बैठकीत निश्चित करण्यात आले. एकूणच बाजारपेठेत गर्दी होणार नाही, दुकानासमोर गर्दी होणार नाही याची काळजी व्यापारी बांधवांनी घ्यावी, अन्यथा पालिका प्रशासनास कारवाई करणे भाग पडेल असेही प्रशासनाने स्पष्ट केले.