गावाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट; १५ आरोग्य पथकांकडून तपासणी सुरू…
वेंगुर्ले,ता.०६ : तालुक्यातील वायंगणी येथील आढळलेल्या त्या कोरोना बाधित आंबा वाहतूक चालकाच्या कुटुंबातील ६ जणांना व त्याच्या सोबत असलेला दुसरा चालक तर मंगलोर वरून आलेल्या वाहन चालक व आंबा वाहतूक वाहनाचा मालक असे मिळून एकूण ९ जणांना ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर वायंगणी, खानोली, दाभोली, केळूस गाव सील करण्यात आले आहेत. या गावांतून कोणत्याही व्यक्तीला आत बाहेर येण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून या भागात आरोग्य विभागाची एकूण १५ पथक सर्व्हे करत असल्याची माहिती मिळाली आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी येथील हा रुग्ण असल्याचे समजताच सर्वाना धक्का बसला आहे. अद्यापपर्यंत प्रशासनाकडून तो कोरोना बाधित रुग्ण कोणत्या कोणत्या गावात गेला व ते गाव सुद्धा कंटेन्मेंट झोन मध्ये आणायचे का याबद्दल तपासणी करीत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ३ वर पोचली आहे. तालुक्यातील वायंगणी गावातील आंबा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर चालक असलेल्या व्यक्तीचे रिपोर्ट काल कोरोना पोझीटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे वायंगणी गावच्या नजीक असलेल्या दाभोली, खानोली, केळूस ग्रामपंचायत क्षेत्र आणि वेंगुर्ला शहर हे कंटेन्मेंट झोन मध्ये येत आहे. यामुळे आज या क्षेत्रातील सर्व दुकाने बाजार व लोकांच्या रहदारीवर पूर्ण निर्बंध घालण्यात आलेले आहेत. कोरोना बाधित रुग्णाच्या कुटुंबात एकूण ६ व्यक्ती असून सर्वांना जिल्हा रुग्णालयात क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर याठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान आज जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम तसेच प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी मुळीक, तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्यकार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांची तहसील कार्यालयात एकत्रित बैठक झाली. त्यानंतर हे सारे प्रशासन वेंगुर्ले शहरासह, वायंगणी गावात असलेल्या सुरक्षा व अन्य बंदोबस्ताची पहाणी केली.
मुंबईतून आल्यावर हा रुग्ण त्या आंब्याच्या गाडीतून कुठे थांबला, त्याने गाडी कोणाच्या ताब्यात दिली. तेथून तो कुठे गेला, नंतर दुसऱ्या गाडीने तो बेंगलोर येथे जाऊन आला, त्या काळात त्याचा कोणा कोणाशी संपर्क आला. तर त्या नंतर तो वेंगुर्लेतुन आडेली गावात गेल्याचे पुढे येत आहे. तेथे तो कोणाकडे राहिला, कोणाला भेटला याची माहिती मिळविली जात आहे. मात्र तो माहिती देण्यास सहकार्य करत नसल्याचे समजते.