विद्युतीकरण सामान वाहून नेणार्या ट्रॉलीला धडकली
कणकवली, ता.०६: कोकण रेल्वे मार्गावर राजापूर आणि वैभववाडी स्थानका दरम्यान पार्सल ट्रेनला आज दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान अपघात झाला. रूळावर ट्रॉली आणून रेल्वे विद्युतीकरणाचे साहित्य घेऊन काही कामगार निघाले होते. अचानक पार्सल ट्रेन आल्याने त्यांनी पळ काढला. मात्र ट्रेन ट्रॉलीला धडकली. यात रेल्वे इंजिनचे मोठे नुकसान झाले. दुसरे इंजिन आणून पार्सल ट्रेन केरळकडे रवाना करण्यात आली. मात्र रेल्वेची परवानगी न घेता खासगी कंपनी रेल्वे मार्गावर ट्रॉलीतून वाहतूक कशी काय करू शकते असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोकण रेल्वे मार्गावर कोरोना प्रादुभार्वामुळे प्रवासी सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर औषधे, आंबे व इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक पार्सल ट्रेन मधून केली जात आहे. आज ओखा (गुजरात) ते तिरूअनंतपुरम (केरळ) अशी पार्सल ट्रेन सोडण्यात आली होती. ही ट्रेन रत्नागिरीहून दुपारी साडे अकरा वाजता निघाली. त्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास राजापूर ते वैभववाडी या स्थानक दरम्यान रूळावर असलेल्या ट्रॉलीला धडक बसली.
कोकण रेल्वे विद्युतीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. त्यासाठीचे खांब उभारणी तसेच विद्युत तारा जोडण्याचे काम वैभववाडीपर्यंत केले जात आहे. हे साहित्य घेऊन खासगी कंपनीचे कामगार रूळावरून निघाले होते. मात्र अचानक ट्रेन येत असल्याचे पाहून त्यांनी ट्रॉली रूळावरच सोडली आणि तेथून पलायन केले. यात पार्सल ट्रेनची ट्रॉलीला धडक बसली मात्र सुदैवाने मोठा अपघात टळला.