परशुराम उपरकर यांची टीका: जिल्ह्यात केवळ 9 व्हेंटीलेटरची उपलब्धता…
कणकवली, ता.०८: मुंबईकर चाकरमान्यांना गावातील जनतेने कधीही दुजाभाव दाखवला नव्हता. मात्र शिवसेना आणि भाजपच्या राजकारणामुळे या दोहोंमध्ये दरी निर्माण होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी काही दिवस मुंबईतच थांबणे योग्य आहे. कारण सिंधुदुर्गात पुरेशा वैद्यकीय सुविधा नाहीत. जिल्ह्यात शासनाकडे 5 आणि खासगी रुग्णालयात 4 असे केवळ 9 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. त्यामुळे पुढील काळात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा ते पेलण्याएवढी सक्षम आहे का? असा प्रश्न मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आज उपस्थित केला.
येथील मनसे संपर्क कार्यालयात श्री.उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, मुंबईकर चाकरमान्यांना गावी आणण्यासाठी शिवसेना आणि भाजप नेतेमंडळींमध्ये चढाओढ लागली आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात मिळालेले चारही कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण मुंबईहून आलेले आहेत. अशा स्थितीत चाकरमानी मोठ्या संख्येने सिंधुदुर्गात आले तर सिंधुदुर्ग जिल्हा रेडझोनमध्ये जायला वेळ लागणार नाही. सिंधुदुर्गवासीयांना चाकरमानी परके नाहीत. मात्र जिल्ह्यात आरोग्य सेवा अत्यंत अपुर्या आहेत. तरीही शिवसेना-भाजपची मंडळी याकडे दुर्लक्ष करून चाकरमान्यांना जिल्ह्यात आणण्याबाबत राजकारण करत आहेत.
ते म्हणाले, हजारो चाकरमानी सिंधुदुर्गात येण्यास इच्छुक आहेत.ते जर जिल्ह्यात आले तर त्यांना क्वारंटाइन करण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. हॉस्पीटलमध्ये बेडची सुविधा नाही. याखेरीज होम क्वारंटाइन झालेले चाकरमानी गावभर फिरत राहिले तर त्यांच्यावर लक्ष कोण ठेवणार? दुसरीकडे शाळा, महाविद्यालयांत क्वारंटाईन केलेल्या चाकरमान्यांना जेवणाचे डबे घेऊन इथले नातेवाईक जाणार, त्यावेळी सोशल डिस्टन्सचा निश्चितपणे फज्जा उडणार आहे. हा धोका शिवसेना-भाजप पुढार्यांच्या अजूनही लक्षात आलेला नाही.
मुंबईतील कांही चाकरमान्यांनी आपण कोरोनावर मात करणार आणि मगच गावी जाणार असल्याचे व्हिडिओ बनवले आहेत त्यांचे आम्ही स्वागत करतो. सध्या ई पास घेऊन सिंधुदुर्गातील आंबा विक्रेते मुंबई-पुणे वगैरे रेड झोन असलेल्या क्षेत्रात आंबा वाहतूक करीत आहेत. त्यांची जाता येता स्वॅब टेस्ट घेणे प्रत्येकवेळी शक्य होणारे नाही.शिवाय त्यांच्याबरोबर चाकरमानी जिल्ह्यात दाखल होत आहेत. परिणामी सिंधुदुर्गात कोरोनाचा फलाव होण्यास मुळीच वेळ लागणार नाही. अशावेळी चाकरमान्यांची सेवा करण्यासाठी जिल्ह्यातील शिवसेना-भाजपचे किती पुढारी आहेत त्यांच्या वैद्यकीय उपचारांची व्यवस्था ते कशी काय करणार आहेत याचा विचार करणे आवश्यक आहे.
श्री.उपरकर म्हणाले, केवळ चाकरमान्यांसाठी आपण काहीतरी करतो आहोत असे दाखवून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांची आरोग्य सुरक्षितता धोक्यात घालणे योग्य होणारी नाही. कोरोनाचे वास्तव केवळ मुंबई,पुणे नव्हे तर संपूर्ण जगाच्या डोळ्यासमोर असताना चाकरमान्यांना जिल्ह्यात आणण्याचा अट्टहास कशासाठी? त्या ऐवजी त्यांची समजूत काढून सिंधुदुर्गात त्यांचे नातेवाईक आज सुरक्षित आहेत त्यांना विनाकारण कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यास भाग पाडू नये. कोरोनाचे संकट दूर झाल्यावर आम्ही सारे गाववाले आमच्या मुंबईच्या चाकरमान्यांचे गावोगावी अगदी ढोलताशांच्या गजरात स्वागतच करू तुम्ही आमचे आहात आणि आमचेच राहणार आहात फक्त राजकारण्यांच्या चुकीच्या आश्वासनांवर विश्वास ठेवू नका असे आवाहनही यावेळी मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी केले.