व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेट्ये ; व्यापाऱ्यांनी नोंदवही ठेवण्याचे आवाहन…
मालवण, ता. ८ : जिल्ह्यातील व्यापार्यांनी ग्राहक नोंदवही ठेवणे बंधनकारक असताना या नियमाचे अनेकांनी उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा व्यापार्यांवर प्रशासनाकडून कारवाई होणार असून व्यापार्यांनी नोंदवही ठेवण्याची कार्यवाही करावी असे आवाहन जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन तायशेट्ये यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापार्यांना लॉकडाऊनमधून काही प्रमाणात सवलत देण्यात आली आहे. त्या सवलतीच्या निर्देशानुसार कापड व्यापारी, टेलर्स, सुवर्णकार, हार्डवेअर व भांड्याचे व्यापारी यांनी आपल्याकडे येणार्या ग्राहकांचे नाव, मोबाईल क्रमांक व पत्ता याची नोंद नोंदवहीत ठेवणे बंधनकारक आहे. याबाबत व्यापारी महासंघाकडून आवश्यक त्या सूचना सर्व व्यापार्यांना करण्यात आल्या होत्या. मात्र याचे बर्याच व्यापार्यांकडून उल्लंघन होत असल्याची माहिती मिळाली आहे. अशा व्यापार्यांवर प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याने संबंधित व्यापार्यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी. अशा सूचना श्री. तायशेट्ये यांनी केल्या आहेत.
कोरोनाच्या संकटात व्यापार्यांनी काळजीपूर्वक आपला व्यवसाय करायचा आहे. वेळोवेळी हात स्वच्छ धुणे, पैसे हाताळताना हॅण्डग्लोज वापरणे, सामाजीक अंतर ठेवणे, तोंडावर मास्क लावणे याचेही पालन करणे ही व्यापार्यांची जबाबदारी व कर्तव्य आहे असेही श्री. तायशेट्ये यांनी स्पष्ट केले.