“त्या” कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कातील १० व्यक्तींचे नमुने निगेटीव्ह…

749
2
Google search engine
Google search engine

के.मंजुलक्ष्मी; आणखी 9 व्यक्तींच्या नमुन्यांचे अहवाल अप्राप्त…

सिंधुदुर्गनगरी ता.०८: जिल्ह्यात सापडलेल्या तिसऱ्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यात आली असून त्यामध्ये 19 व्यक्ती या अतिजोखमीच्या संपर्कातील आहेत. या सर्वांचे घशातील स्त्रावाचे नमुने (स्वॅब) घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यातील 10 व्यक्तींच्या नमुन्यांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आणखी 9 व्यक्तींचे अहवाल येणे बाकी आहे. तर 22 व्यक्ती या कमी जोखमीच्या संपर्कातील असून त्यांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर काल सापडलेल्या कोरोना बाधीत युवकास तपासणी नाक्यावरूनच कुडाळ येथील संस्थात्मक अलगीकरणात पाठविण्यात आल्यामुळे त्याच्या संपर्कातील व्यक्तींची संख्या कमी आहे. या रुग्णाच्या संपर्कात एकूण 11 व्यक्ती आल्या होत्या त्यामधील 7 व्यक्ती या अतिजोखमीच्या संपर्कातील आहेत. तर 4 व्यक्ती या कमी जोखमीच्या संपर्कातील आहेत. अतीजोखमीच्या व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर कमी जोखमीच्या व्यक्तींना गृह अलगीकरणात ठेवले आहे.
सध्या जिल्ह्यात 683 व्यक्ती अलगीकरणात असून त्यापैकी 423 व्यक्ती गृह अलगीकरणात तर 260 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाने आतापर्यंत 671 नमुने तपासणीसाठी पााठविले असून त्यापैकी 628 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. प्राप्त अहवाला पैकी 4 अहवाल पॉजिटीव्ह आला असून 624 नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये आजमितीस 55 रुग्ण दाखल आहेत. आरोग्य विभागामार्फत आज रोजी एकूण 4214 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून तसेच जनतेला कोव्हीड – 19 बाबत माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने आरोग्य सेतू हे ॲप तयार केले आहे. कोरोना प्रतिबंधासाठी सदर ॲप अत्यंत उपयुक्त असून हे ॲप डाऊनलोड करणे महत्वाचे असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी हे ॲप डाऊनलोड करावे व कोरोना विरुद्धच्या या लढ्यामध्ये सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर जिल्ह्यातून व परराज्यातून येऊ इच्छिणारे नागरिका तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून परजिल्ह्यात व परराज्यात जाऊ इच्छिणारे नागारिक जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर आपली माहिती भरुन पाठवित आहेत. सदर प्राप्त माहितीवरून परजिल्ह्यात व परराज्यात जाणाऱ्या व येणाऱ्या नागरिकांकरिता पास देण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनामार्फत सुरू आहे. जिल्हा प्रशासनाकडून दिनांक 1 मे 2020 रोजी पासून आजअखेर पर्यंत प्रवासासाठी एकूण 678 पास देण्यात आले आहेत. तसेच परजिल्ह्यात जाणाऱ्या व जिल्ह्यात येणाऱ्या लोकांसाठी एस.टी. बसची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच याबाबतची योग्य ती सर्व व्यवस्था करण्याबाबतचे आदेश वाहतूक महाव्यवस्थापक यांनी सर्व विभाग नियंत्रक यांना दिल्या आहेत.
आतापर्यंत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जाण्यासाठी 9 हजार 626 व्यक्तींनी जिल्हा प्रशासनाच्या लिंकवर नोंद केली आहे. या सर्वांना त्यांच्या संबंधित जिल्ह्यामध्ये प्रवेश देण्याबाबत त्या त्या जिल्हा प्रशासनास कळविण्यात आले आहे.
तर राज्याबाहेर जाण्यासाठी 11 हजार 65 व्यक्तींनी लिंकवर नोंदणी केली आहे. या सर्वांना त्यांच्या संबंधित राज्यात प्रवेश देण्याबाबत त्या त्या राज्य शासनास कळविण्यात आले आहे.
सिंधुदुर्गात येण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून सुमारे 18 हजार व्यक्तींनी नोंदणी केली आहे. त्यापैकी रेड झोनमधील हॉटस्पॉट व कंटेन्मेंट झोन मधील व्यक्ती वगळून 2 हजार 448 व्यक्तींची माहिती परवानगी देण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनास कळविले आहे.
परराज्यातून जिल्ह्यात परतण्यासाठी 1396 व्यक्तींनी नोंद केली आहे. गोवा राज्यातून सुमारे 700 व्यक्तींना जिल्ह्यात प्रवेश देण्यात आला आहे. तर महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यांमधून मिळून 469 व्यक्तींना जिल्ह्यात येण्यास परवानगी देण्यात आली आहे.