मुख्याधिकार्यांची बैठकांना तसेच नगरपंचायतमध्ये अनुपस्थिती
कणकवली, ता.०८: कणकवली नगरपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार तहसीलदार आर.जे.पवार यांचेकडे सुपूर्त करण्यात आला आहे. त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी निर्गमित केले आहेत. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे हे जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकांना तसेच नगरपंचायतीमध्येही अनुपस्थित राहत असल्याचे कारण यामागे देण्यात आले आहे.
कोरोना प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर समन्वय राहावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमुख अधिकार्यांच्या बैठका घेतल्या जातात. मात्र या बैठकांना कणकवलीचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे गैरहजर राहत असल्याचे जिल्हाधिकार्यांच्या निदर्शनास आले होते. तसेच ते कणकवली नगरपंचायत कार्यालयातही अनुपस्थित राहत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी कणकवली नगरपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार कणकवलीचे तहसीलदार आर.जे.पवार यांच्याकडे सोपवला आहे.