आरोग्य यंत्रणेवर ताण; परप्रांतीय कामगार मूळ गावी जाण्यासाठी उत्सुक…
बांदा,ता.०९: कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर आपल्या मूळ गावी जाण्यासाठी परप्रांतीयांना शासनाने परवानगी देण्यासाठी पाऊले उचलली खरी, मात्र याचा अतिरिक्त ताण आता आरोग्य प्रशासनावर येऊ लागला आहे. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात गावी जाण्यासाठी आवश्यक असणारे आरोग्य तपासणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बांदा प्रथमिक आरोग्य केंद्रात गेल्या तीन दिवसांपासून परप्रांतीय कामगारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. आज चौथ्या दिवशी देखील भल्या सकाळीच कामगारांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
रोजच्या ओपीडी बरोबरच बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अतिरीक्त ताण पडत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्याबरोबर या परप्रांतीयांची आरोग्य तपासणी करावी लागत आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढत असल्याने प्रशासनाने परप्रांतीय कामगारांना रीतसर कागदपत्रांची पुर्तता करून त्यांच्या गावी जाण्यासाठी परवानगी दिली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी वैद्यकीय तपासणी केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
गेल्या तीन दिवसात बांदा आरोग्य केंद्रात ४५५ परप्रांतीयांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून यातील निम्म्याहून जास्त लोकांना आरोग्य तपासणी प्रमाणपत्र देण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले. अजूनही परप्रांतीय कामगार मोठ्या संख्येने आरोग्य केंद्रात येत असल्याने येत्या काही दिवसात आरोग्य यंत्रणेवरील ताण हा निश्चितच वाढणार आहे.