गर्दी रोखण्यासाठी पोलिसांची कारवाई, अन दुचाकीस्वारांची पळापळ
कणकवली, ता.०९: सोशल डिस्टन्सींगचे पालन न करता गर्दी करणार्या नागरिकांवर आवर घालण्यासाठी पोलिसांनी आज कारवाई केली. यात बाजारात उभ्या असलेल्या शंभरहून अधिक दुचाकींच्या टायरमधील हवा काढण्यात आली. तर डबलसीट घेतलेल्या दुचाकी चालकांना दंड करण्यात आल्या. पोलिसांच्या या कारवाईमुळे बाजारात आलेल्या दुचाकीस्वारांची पळापळ झाली. तसेच बाजारपेठेतील गर्दीही पांगली.
पोलिस यंत्रणेकडून वारंवार आवाहन करून देखील कणकवली बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ वाढतीच राहिली आहे. आजपासून सम विषम दुकान सुरू ठेवण्याची कार्यवाही सुरू ठेवण्यात आली. त्यानुसार आज बाजारपेठेच्या दक्षिण बाजूची दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. तर उत्तर बाजूची दुकाने बंद होती. तरीही सकाळी साडे आठ वाजल्यापासून बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. रस्त्यालगत दुचाकी देखील अस्ताव्यस्त पार्किंग करून ठेवण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी देखील झाली होती. त्यामुळे सकाळी साडे नऊ वाजल्यापासून पोलिसांनी कारवाई सुरू केली. यात उभ्या असलेल्या दुचाकींची टायरमधील हवा काढून टाकण्यात आली.
पोलिसांच्या या कारवाईनंतर बाजारात खरेदीसाठी आलेल्या दुचाकीस्वारांनी मोठी पळापळ झाली. शहर तसेच लगतच्या पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने ग्राहक दुचाकीवरून आले होते. यात डबलसीट असलेल्या दुचाकीस्वरांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दरम्यान कारवाई होणार या भीतीने रिक्षा चालकांनीही बाजारपेठेतून निघून जाणे पसंत केले होते. कणकवली पोलिसांच्या या कारवाई नंतर बाजारपेठेतील गर्दी ओसरली होती. तसेच दुकानांमध्येही सोशल डिस्टन्सचे पालन केले जात असल्याचे चित्र होते.