दोडामार्ग सरपंच संघटना; तहसीलदार मोरेश्वर हाडके यांच्याकडे मागणी…
दोडामार्ग/सुधाकर धर्णे ता.०९: शासनाच्या गाईड लाईन नुसार ऑरेंज आणि ग्रीन झोन मधुन आलेल्या नागरिकांना आम्ही गावात क्वारंटाईन करुन घेवू,मात्र रेड झोन मधून आलेल्या व्यक्तीची तजवीज ही प्रशासनाने तालुक्याच्या ठिकाणी करावी,जो पर्यत अशा व्यक्तींची कोरोना टेस्ट निगेटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त होत नाही,तो पर्यत रेड झोन मधिल व्यक्तींना गावात प्रवेश दिला जाणार नाही,असा आक्रमक पवित्रा तालुका सरपंच संघटनेने घेतला आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे मुंबई येथुन येणाऱ्या चाकरमान्यांना गावात क्वांरटाईन करुन घेण्याच्या मुद्द्यावर आज दुपारी तालुक्यातील सरपंच सेवा संघटनेने दोडामार्ग तहसिलदार मोरेश्वर हाडके यांची भेट घेतली.
यावेळी तालुक्यातील सरपंचांनी गावातील प्राथमिक शाळेमधे असणाऱ्या स्वच्छतागृह,फँनची सुविधा पाण्याची कमतरता आदी गैरसोयीबद्दल तहसिलदारांचे लक्ष वेधले गेले.त्याचबरोबर काही शाळा ह्या भरलोकवस्तीमधे आहेत पुरेश्य सोयी नाहीत या शाळाबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती देखिल केली.
शासनाच्या गाईडलाईन नुसार ऑरेंज आणि ग्रीन झोन मधुन येणाऱ्या व्यक्तींना गावातील प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेत क्वारंटाईन करुन घेवु मात्र रेड झोनमधुन येणाऱ्या व्यक्तींची कोरोना टेस्ट जो पर्यत निगेटिव्ह येत नाही तो पर्यत त्यांना गावात क्वारंटाईन करणार नाही अशा लोकांना तालुक्याच्या ठिकाणी माध्यमिक शाळेत किंवा अन्य ठिकाणी क्वारंटाईन करावे असे देखिल यावेळी संघटनेकडून सांगण्यात आले.
सरपंचांना वेठीस धरुन त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्यास तालुक्यातील सर्व सरपंच सामुहिक राजीनामे देतील असे सरंपच सेवा संघटनेचे दोडीमार्ग तालुका अध्यक्ष पराशर सांवत यांनी सांगितले
यावेळी जिल्हा सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रेमानंद देसाई,माजी जि.प.समाजकल्याण सभापती अंकुश जाधव,तालुका अध्यक्ष पराशर सांवत त्याचबरोबर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच यावेळी उपस्थित होते.