शाळा, मंगल कार्यालयात आधी सुविधा निर्माण करा
कणकवली, ता.9 :चाकरमान्यांना सिंधुदुर्गात आणण्यास आमचा विरोध नाही. मात्र जिल्हा प्रशासनाने त्याची आधी पूर्वतयारी करावी. शाळा, मंगल कार्यालयांमध्ये किती चाकरमानी राहू शकतील. त्यांना सुविधा कशा पुरवता येतील याचे नियोजन आधी करा. नंतरच टप्पाटप्प्याने चाकरमान्यांना जिल्ह्यात प्रवेश द्या अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली.
श्री.तेली यांनी आज येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, राज्य शासन चाकरमान्यांना गावी जाण्यास परवानगी देण्याबाबत विचाराधीन आहे. तर दुसरीकडे गावातील मंडळीचा चाकरमान्यांच्या प्रवेशाला विरोध आहे. कारण गावातील नागरिकांना आपल्या आरोग्याचीही काळजी आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासकीय सूचना आणि निर्देशांचे काटेकोर पालन केले आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील एकही व्यक्ती कोरोना बाधित झालेली नाही. याउलट मुंबईतून आलेले चौघे कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
श्री.तेली म्हणाले, मोठ्या संख्येने चाकरमानी गावी आले तर त्यांच्या राहण्याची, जेवणाची तसेच या सर्वांची आरोग्य तपासणी करण्याएवढी यंत्रणा आपणाकडे नाही. त्यामुळे तशी यंत्रणा आधी निर्माण करावी लागले. तसेच चाकरमान्यांना आणण्यापूर्वी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, डॉक्टर आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींना एकत्र आणून चर्चा घडवून आणायला हवी. त्यानंतर टप्पाटप्प्याने चाकरमान्यांना जिल्ह्यात प्रवेश द्यायला हवा.
श्री.तेली म्हणाले, आज जिल्ह्यातून 10 हजार पेक्षा अधिक परप्रांतीय व्यक्ती आपापल्या गावी जाण्यासाठी इच्छुक आहेत. जिल्हा प्रशासनाने या सर्वांना आधी त्यांच्या गावी जाण्याची परवानगी द्यावी. हे सर्व नागरिक आपापल्या गावी गेल्यानंतर चाकरमान्यांना सिंधुदुर्गात आणावे म्हणजे प्रशासनाचाही भार कमी होणार आहे.
दरम्यान राज्य शासनाने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 45 कोटींचा निधी दिला आहे. याखेरीज मायनिंग मधून 18 कोटींची रॉयल्टी जमा झाली आहे. तसेच जिल्हा परिषदेचा 22 ते 25 कोटी एवढा सेस फंड आहे. या सर्व निधीमधून जिल्ह्यात येणार्या चाकरमान्यांसाठी सुविधा निर्माण करा अशीही मागणी श्री.तेली यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.