सोशल डिस्टन्सिंग धाब्यावर ; स्वतः तहसिलदार उतरले रस्त्यावर
बांदा, ता. ११ : ग्रामपंचायत व व्यापारी संघाने बैठक घेऊन सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळण्याचे आवाहन करूनही आज बांदा आठवडा बाजारात ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली. गर्दी आवरताना पोलिस व ग्रामपंचायत प्रशासनाच्या नाकीनऊ आले. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर बांदा आठवडा बाजारासाठी स्थानिक प्रशासनाने नियमावली तयार केली होती. मात्र आज आठवडा बाजारात सर्व नियोजन फोल ठरले. शहरात कट्टा कॉर्नर, आळवाडी, गांधीचौक येथे लोकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. पोलीस नागरिकांना सूचना करत होते. मात्र गर्दीसमोर पोलिसांचे कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. सरपंच अक्रम खान यांनी याबाबतची कल्पना तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना दिल्यानंतर स्वतः तहसीलदार म्हात्रे यांनी बांदा बाजारपेठेत येत व्यापाऱ्यांना व नागरिकांना सूचना पाळण्याचे आवाहन केले. मात्र दुपारपर्यंत गर्दी कायम होती.