वेळ वाचणार ; गोवा व सिंधुदुर्ग प्रशासनात झालेल्या चर्चेअंती निर्णय
बांदा, ता. ११ ः महाराष्ट्रातून गोव्यात जाणार्या वाहनांची गोवा नाक्यावर तर गोव्यातून महाराष्ट्रात येणार्या वाहनांची तपासणी महाराष्ट्र नाक्यावर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व गोवा प्रधान सचिव पुनीत गोयल यांच्यात झालेल्या चर्चेअंती हा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यामुळे दोन्ही चेकपोस्टवर तपासणीमुळे विलंब टळणार आहे. महाराष्ट्र-गोवा चेकपोस्टवर गोवा शासनाच्या तपासणीमुळे बांद्याच्या दिशेने लांबच लांब रांगा लागत होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित वाहनांचे परजिल्ह्यातील चालक नाश्त्यासाठी बांदा बाजारपेठेत येत असल्याने नागरिकांमधून भीती व्यक्त करण्यात येत होती. याबाबत नागरिकांच्या संतप्त भावना व्यक्त होत होत्या. त्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. महाराष्ट्र-गोवा चेकपोस्टवर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी भेट देत वस्तुस्थितीची पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, गोवा प्रधान सचिव पुनीत गोयल, उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका, गोवा पोलीस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून, डिवायएसपी गजानन प्रभूदेसाई, पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर, सावंतवाडी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, डीवायएसपी शिवाजी मुळीक, तहसीलदार राजाराम म्हात्रे, मोटर वाहन निरीक्षक जितेंद्र पाटील, बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव उपस्थित होते. चर्चेअंती महाराष्ट्रातून गोव्यात जाणार्या वाहनांची केवळ गोवा चेकपोस्टवर तपासणी होईल. तर गोव्यातून महाराष्ट्रात येणार्या वाहनांची महाराष्ट्र चेकपोस्टवर तपासणी करण्याचे मान्य करण्यात आले. त्यामुळे गोवा व महाराष्ट्र चेकपोस्टवरील तपासणीचा प्रत्येकी एक काऊंटर बंद करण्यात आला. तपासणी प्रक्रिया जलद होण्यासाठी अतिरिक्त काऊंटर सुरु करण्याचे निर्देश प्रधान सचिव गोयल यांनी दिले. यावेळी सुशांत पांगम, गजानन गायतोंडे, राजेश विरनोडकर, देवा कुबल यांनी वाहनधारकांच्या व्यथा मांडल्या. बांबोळी रुग्णालयात पेशंट नेताना चेकपोस्टवर होणारी वाताहत जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. अत्यवस्थ पेशंटना घेऊन जाणार्या रुग्णवाहिकांना किरकोळ तपासणीनंतर तीच रुग्णवाहिका पुढे सोडण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले.