राज्य मत्स्य विभागाने पाठपुरावा केलाय का? ; पारंपरिक मच्छीमारांनी मागितली माहिती…
मालवण, ता. ११ : राष्ट्रीय सागरी हद्दीत बेकायदेशीररित्या होणाऱ्या एलईडी पर्ससीननेट मासेमारीवर कारवाईचे अधिकार कोणत्या शासकीय यंत्रणेला आहेत. त्यासंदर्भात राज्य मत्स्य विभागाने शासनाकडे पाठपुरावा केला आहे का? यासंदर्भात मत्स्य दुष्काळग्रस्त पारंपरिक मच्छीमारांनी मत्स्य विभागाकडे लेखी स्वरूपात माहिती मागितली आहे.
पारंपरिक मच्छीमार महेंद्र पराडकर यांनी काही दिवसांपूर्वी एलईडी मासेमारीचा धुमाकूळ सुरू असल्याबाबत मत्स्य विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर मत्स्य विभागाने अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अहवालपत्रात राष्ट्रीय हद्दीत एलईडी नौका मासेमारी करीत असल्याचे नमूद केले होते. या पार्श्वभूमीवर श्री. पराडकर यांनी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांना निवेदन सादर करून राष्ट्रीय हद्दीत कारवाईचे अधिकार कोणत्या शासकीय यंत्रणेस आहेत यासंबंधी विचारणा केली आहे. सहाय्यक मत्स्य आयुक्तांच्या अनुपस्थितीत सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर यांनी हे निवेदन स्विकारले.
निवेदनात श्री. पराडकर यांनी अजूनही काही प्रश्न विचारले आहेत. राष्ट्रीय हद्दीत होणाऱ्या एलईडी मासेमारीवर कुठल्या कायद्यातंर्गत कारवाई होऊ शकते. राज्यातील पर्ससीन नेट नौकांना राष्ट्रीय हद्दीत पर्ससीन नेट मासेमारीस परवानगी असेल तर ती कोणत्या कालावधीसाठी आहे आणि राज्यातील किती पर्ससीन नौकांना राष्ट्रीय हद्दीत मासेमारीची परवानगी प्राप्त आहे याचाही खुलासा मत्स्य विभागाने करावा, अशी मागणी श्री. पराडकर यांनी केली आहे. त्याचप्रमाणे ९ मे रोजी सायंकाळी ८.१५ वाजता परवाना अधिकारी श्री. भालेकर यांना संपर्क साधून सर्जेकोट कवडा रॉकजवळ सुमारे २० वावात एलईडी मासेमारी नौका कार्यरत असल्याचे कळविले होते. त्यासंदर्भात पुढे मत्स्य विभागाने कोणती कार्यवाही केली त्याचीही माहिती मिळावी अशी मागणी श्री. पराडकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.