परशुराम उपरकर ; मोठ्या संख्येने येणार्या रुग्णांच्या तपासणीची व्यवस्था काय….?
कणकवली, ता.११: सिंधुदुर्गात मुंबईकर चाकरमान्यांचा ओघ वाढला आहे. गावागावातील शाळांमध्ये चाकरमानी क्वारंटाईन होऊ लागले आहेत. पुढील काळात जर नोंदणी झालेले सर्व 17 हजार चाकरमानी सिंधुदुर्गात आले तर तपासणीची व्यवस्था काय आहे? याचे कोणतेही उत्तर जिल्हा शल्यचिकित्सक देत नाहीत. ते फक्त कागदी घोडे रंगवून सिंधुदुर्गची आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे पोकळ दावे करत आहेत अशी टीका मनसेच प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आज केली.
येथील मनसे संपर्क कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनसेच जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर उपस्थित होते. श्री.उपरकर म्हणाले, सिंधुदुर्गात 17 हजार चाकरमानी येऊ घातले आहेत. यातील अनेकजण रेड झोनमधील आहेत. सध्या जे चाकरमानी येत आहेत. त्यांना स्वॅब नमुने घेण्यासाठी तब्बल पाच-पाच तास वेटिंग राहावे लागत आहेत. पुढील काळात मोठ्या संख्येने चाकरमानी आले तर त्यांचे स्वॅब नमुने घेण्यासाठी काय व्यवस्था आहे हे देखील जिल्हा शल्यचिकित्सकांनी जाहीर करायला हवे.
ते म्हणाले, जिल्हा शल्यचिकित्सक नाक,कान, घसा तज्ञ असतानाही ते कोणतीही तपासणी करत नाहीत. तर इतर डॉक्टर कोरोना व इतर आजाराच्या रुग्ण तपासणी करत आहेत. तसेच रुग्णांची काळजी देखील घेत आहेत. मात्र याचे सर्व श्रेय जिल्हा शल्यचिकित्सक घेत आहेत. सिंधुदुर्गात आतापर्यंत चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले आहेत. तरीही कोरोना ड्यूटीवर असणार्या नर्स आणि इतर स्टाफचा 50 ते 20 लाखाचा विमा उतरविण्यात आलेला नाही. दरम्यान शासकीय रुग्णालयात लागणार्या वस्तू जिल्ह्यातील बाजारपेठांत उपलब्ध आहेत. मात्र शल्यचिकित्सक त्या अन्य जिल्ह्यातून का मागवत आहेत असाही प्रश्न श्री.उपरकर यांनी केला.