जिल्ह्यातील 52 जणांचा समावेश : कोरोनाच्या काळात सकारात्मक भूमिका घेण्याची मागणी
सावंतवाडी / अमोल टेंबकर, ता. 11 : केवळ तोंडी परिक्षा न झाल्यामुळे एनआरएचएम कार्यक्रमाअंतर्गत नेमण्यात येणार्या समुदाय आरोग्य अधिकार्यांची नियुक्ती राज्यात थांबलेली आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 52 अधिकार्यांचा समावेश आहे.
दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तोंडी परिक्षा रद्द करून किंवा लवकरात लवकर घेवून लोकांच्या सेवेसाठी त्या समुदाय आरोग्य अधिकार्यांना सेवेत घेण्यात यावे अशी मागणी आता जोर धरत आहे. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जिल्हा शल्य चिकित्सक यांनी लक्ष घालावा आणि याबाबत सकारात्मक धोरण ठरवावे अशी मागणी संबंधित उमेदवारांची आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, समुदाय आरोग्य अधिकार्यांची उन्हाळी परीक्षा फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आली होती. त्यात 3314 उमेदवार बसले होते. त्यापैकी 3 एप्रिल व 27 एप्रिल रोजी एकूण साधारणतः 2800 समुदाय आरोग्य अधिकार्यांचा निकाल लागला. मात्र उर्वरीत 491 समुदाय आरोग्य अधिकार्यांच्या केवळ दोन प्रात्यक्षिक परीक्षा झाल्या नसल्यामुळे त्यांचा निकाल लावणे विद्यापीठाला अवघड झाले आहे. तर निकाल न लागल्याने जिल्हास्तरावर संबंधितांना नियुक्त्या देणे जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या अधिकार्यांना अवघड झाले आहे.
संबंधितांना कोरोनासारख्या महामारीच्या काळात लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येऊ शकतील. मात्र केवळ तोंडी परीक्षा न झाल्यामुळे ही पुढील सर्व प्रक्रिया थांबली आहे असे संबंधित नवोदित अधिकार्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कोरोना आजाराच्या काळात लोकांना फायदा होण्यासाठी तसेच आरोग्य सुविधा मिळण्यासाठी तोंडी परीक्षा रद्द करून किंवा पुढील ढकलून संबंधित 491 अधिकार्यांना नेमणूक देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या समुदायात सिंधुदुर्गातील तब्बल 52 आरोग्य अधिकारी आहेत. त्यांना नेमणूक देण्यात आल्यास त्याचा फायदा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना व ग्रामीण भागातील लोकांना होणार आहे. त्यामुळे याबाबत पालकमंत्री व जिल्हा आरोग्य प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी होत आहे.