दुचाकी जप्त, मालवण पोलिसांची कारवाई ; उद्या न्यायालयात हजर करणार…
मालवण, ता. ११ : शहरात दुचाकीस बंदी असताना दुचाकीचालक सुनील महादेव खरात वय-२९ रा. रेवतळे चंडिका मांड याने न थांबता पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा तसेच उद्धट उत्तर दिल्याचा प्रकार आज सकाळी घडला. यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशिरा त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. यात दुचाकी जप्त करण्यात आली आहे. उद्या त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
याबाबतची फिर्याद पोलिस कर्मचारी सुनील जाधव यांनी दिली आहे. शहरात दुचाकी वाहतुकीस पूर्णतः बंदी आहे. यात आज सकाळी रेडकर हॉस्पिटल येथून दुचाकीवरून जाणाऱ्या सुनील खरात या तरुणाला पोलिसांनी अडविले असता तो न थांबता पुढे गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला पकडले असता त्याने गाडी पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय पोलिसांशी उद्धट वर्तन केले. त्यामुळे त्याला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने मद्य प्यायले असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सुनील खरात याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर अटकेची कारवाई उशिरा करण्यात आली. उद्या त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण अधिक तपास करत आहेत.