ओरोस-गावडेवाडी येथील प्रकार; ७ जणांवर गुन्हा दाखल…
ओरोस ता १२:लॉक डाऊन काळात धरणाच्या काठावर मौजमजा करणाऱ्या त्या युवकांवर पोलिसांनी कारवाई केली असून संचार बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात अक्षय पारकर (२६), विशाल दळवी (३०), सचिन वराडकर (२८) सर्व रा. ओरोस व विशाल वाळके (२५) रा. सुकळवाड यांच्यासह अन्य ३ अज्ञात संशयितांचा समावेश आहे.ही कारवाई काल रात्री उशिरा सिंधुदुर्गनगरी पोलिसांकडून करण्यात आली होती.दरम्यान या कारवाईत अन्य काहींजणांना वगळण्यात आल्याची चर्चा आहे.
देशासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना विषाणू मुळे लॉक डाउन सुरु आहे.त्यामुळे जिल्ह्यात पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्ति एकत्र येवू नयेत असे प्रशासनाचे आदेश आहेत. अशाप्रकारे संचारबंदी लागू असताना ओरोस येथील काही तरुणांनी आपल्या एका मित्राचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्याचा बेत आखला होता.त्यानुसार सर्व तयारी करण्यात आली होती.मित्राच्या वाढदिवसाची मौजमजा करण्यासाठी काही तरुण ओरोस गावडेवाडी तलावाच्या काठावर जमले होते. ठरल्यानुसार पार्टी सुरु झाली होती. मात्र गावातील सतर्क नागरिकांनी याबाबतची माहिती सिंधुदुर्गनगरी पोलिसांना दिली. त्यानुसार या धरणावर पार्टी सुरु आहे का ? याबाबत खातरजमा करण्यासाठी पोलिसांचे एक पथक ओरोस गावडेवाडी धरणावर गेले असता हा प्रकार उघड़कीस आला. त्यामुळे संचारबंदी काळात पार्टी करणाऱ्या अक्षय पारकर, विशाल दळवी, सचिन वराडकर यांच्यासह अन्य ३ अज्ञातां विरोधात कलम १८८ नुसार संचारबंदी कायदा, साथरोग प्रतिबंधात्मक कायद्या आणि अन्य कायद्यान्तर्गत गुन्हा दाखल करन्यात आला आहे.या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस नाईक सचिन गवस करत आहेत.
काहींना वाचविल्याची चर्चा
या पार्टीत १५ ते २० युवक असल्याची चर्चा सुरु होती. तेवढया युवकांना सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात आणल्याचे बोलले जात आहे.मात्र, यातील केवळ सात व्यक्तीं विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.अनेकांना अभय देण्यात आला आहे.अभय दिलेल्या युवकांत राजकीय वारसा असलेल्यांचा समावेश असल्याचेही बोलले जात आहे.
नागेश ओरोसकर यांची तक्रार
पोलिसांनी ही पार्टी मोडून काढित सहभागी युवकांना पोलिस ठाण्यात आणले. ही बातमी वाऱ्या सारखी गावात पोहोचली. याबाबत सोशल मिडियावर मॅसेज फिरू लागले. ओरोस गावाचा सर्वपक्षीय असलेल्या एका व्हाट्स अप ग्रुपवर ग्राम पंचायत सदस्य नागेश ओरोसकर यांचे नाव टाकून ते सहभागी असल्याचा मॅसेज एका राजकीय व्यक्तीने टाकला होता. माझा त्या पार्टीत कोणत्याही प्रकारचा सहभाग नसताना माझी बदनामी करण्यासाठी हा मॅसेज टाकण्यात आला आहे. त्यामुळे सबंधितावर कडक कारवाई करावी, अशी तक्रार नागेश ओरोसकर यांनी सिंधुदुर्गनगरी पोलिस स्थानकात दिली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिस कार्यवाही सुरु होती.