चाकरमान्यांना आणा, पण टप्प्याटप्याने; भाजप पदाधिकार्यांची प्रांताधिकार्यांकडे मागणी….
सावंतवाडी,ता .१३: मुुंबईकर चाकरमान्यांना जिल्ह्यात आणू नये, म्हणून भाजपाची भूमिका नाही. मात्र संबधितांना आणताना रत्नागिरीची पुनरावृत्ती या ठीकाणी होवू नये, यासाठी टप्पाटप्प्याने त्यांना या ठीकाणी आणावे, आवश्यक असलेली काळजी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी आज येथे आयोजित बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींकडुन करण्यात आली.
दरम्यान जिल्हा परिषद शाळांमध्ये राहणार्या लोकांची सोय व्हावी, यासाठी आवश्यक असलेले टॉयलेट, बाथरुम उभारण्यासाठी खनिकर्म विभागासह जिल्हा परिषदेचा निधी खर्च करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
येथिल प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांची आज भाजपाच्या पदाधिकार्यांनी भेट घेतली. यावेळी सावंतवाडी उपविभागात येणार्या लोकांना नेमक्या कोणत्या सेवा सुविधा देण्यात आल्या आहेत, त्याच बरोबर त्यांची सोय कशा पध्दतीने केली आहे, याबाबतची माहीती घेण्यात आली.
दरम्यान उपस्थित पदाधिकार्यांनी संबधित लोकांना जिल्ह्यात आणताना प्रशासन लोकप्रतिनिधी आणि सरपंचाना विश्वासात घेत नाहीत, त्यामुळे याला जबाबदार कोण?, असा प्रश्न केला. त्यामुळे याबाबत प्रशासनाकडुन योग्य ती भूमिका ठरविण्यात यावी, असे यावेळी सांगण्यात आले.