राजेंद्र म्हापसेकर; मग आमच्या जिल्ह्यात शंभर खाटांचे रुग्णालय का उभे राहू शकत नाही…
सावंतवाडी, ता. १३ : गोवा शासनाने गेली अनेक वर्षे सिंधुदूर्ग जिल्ह्याला सहकार्य केले आहे, असे असताना कोरोनाच्या पार्श्वभूमिवर त्यांच्यावर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर केलेली टिका ही दुदैवी आहे, असे मत जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी आज येथे केले व्यक्त केले. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गुजरातसह वानखेडे स्टेडीयमवर हॉस्पिटल उभे राहू शकते. मग सिंधुदुर्ग जिल्ह्यात शंभर खाटांचे हॉस्पिटल का उभे राहू शकत नाही याचे उत्तर येथील सत्ताधार्यांनी द्यावे, राजकारणासाठी राजकारण करणे चुकीचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
श्री. म्हापसेकर यांनी आज येथील प्रांताधिकार्यांची भेट घेतली. त्यानंंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, गोवा शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला आणि विशेषतः सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्याला नेहमीच सहकार्य केले आहे. असे असताना कोरोनाच्या काळातसुध्दा त्यांच्याकडे आम्ही मदत मागितली. ती त्यांनी देण्याबाबत सकारात्मक चर्चा करू, असे आश्वासन दिले. मात्र जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी त्यांच्यावर थेट टिका करणे, हे आमचे दुर्दैव आहे.
श्री. म्हापसेकर पुढे म्हणाले, या ठिकाणी जिल्ह्यातील रुग्णांना काही दिवस गोव्यात प्रवेश नव्हता. मात्र अत्यवस्थ रुग्णांना आता घेण्यात येत आहे. त्याचबरोबर गोव्यात काम करणार्या परंतू लॉकडाउनच्या काळात जिल्ह्यात अडकलेल्या एकाही कामगाराचा रोजगार जाणार नाही, अशी भूमिका गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी राजकारण न करता सहकार्य होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, या ठिकाणी जिल्ह्यात येणार्या चाकरमान्यांची व्यवस्था जिल्हा परिषद शाळांमध्ये करण्याचे काम सुरू आहे. मात्र त्या ठिकाणी आवश्यक असलेली टॉयलेट, बाथरुमची सोय उभारण्यासाठी मायनिंग फंड तसेच जिल्हा परिषद फंडमधून पैसे खर्च करण्यात यावेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, महेश सारंग आदी उपस्थित होते.