राजन तेलींची टिका; सत्ताधार्यांनी राजकारण न करता सर्वाना विश्वासात घ्यावे…
सावंतवाडी,ता.१३: कोरोना सारख्या काळात सुध्दा सिंधुदूर्ग जिल्हा प्रशासनाचा नियोजनशुन्य कारभार आहे, तर सत्ताधारी आणि पालकमंत्री श्रेयवादाचे राजकारण करीत आहेत , असा आरोप करीत या काळात प्रसंगावर मात करण्यापेक्षा सर्वाना विश्वासात घेणे गरजेचे आहे, अशी मागणी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला.
दरम्यान कॉरन्टाईन केलेल्यांना गावात काही लहान मुलांच्या माध्यमातून डबे पोहोचविले जात आहे, हे धोकादायक आहे. भविष्यात गावागावात सुध्दा कोरोनाची लागण होवू शकते, त्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. मात्र दुर्दैवाने म्हणावे तशी काळजी घेतली जात नाही, असे त्यांनी सांगितले.
श्री तेली यांनी आज येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मुंबई,पुणे येथील रेड झोन मधून येणार्या लोकांना कॉरन्टाईन करण्यासाठी मंगल कार्यालये घेणे गरजेचे आहे. आमच्या संबधित लोकांना घेवू नका, आणू नका, अशी भूमिका कधीच नव्हती. परंतू सर्वाना एकाच वेळी मुंबईतील काही अधिकार्यांकडुन पास वाटले जात आहेत, मात्र एकाच वेळी सर्वजण आले तर निश्चितच त्याचा ताण पडणार आहे. त्यामुळे याबाबत पुर्नविचार व्हावा. संबधितांना टप्प्याटप्प्याने आणावे, अशी आमची मागणी राहणार आहे.
तेली पुढे म्हणाले, या ठीकाणी परिवहन मंत्र्यांनी आपण एसटीबस मोफत देतो, असे जाहीर केले आहे. परंतू एक ही एसटी सोडण्याबाबत या ठिकाणावरुन नियोजन करण्यात आलेले नाही. ही वस्तूस्थिती आहे. असे तेली म्हणाले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेद्र म्हापसेकर, नगराध्यक्ष संजू परब,मनोज नाईक,महेश सारंग,सुधीर आडीवरेकर आदी उपस्थित होते.