हेमंत मराठेंच्या प्रयत्नांना यश; रस्ता खराब झालेल्या ठिकाणी उपाय योजना…
सावंतवाडी, ता. १३ : सावंतवाडी-मळेवाड मार्गावर खराब झालेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.याबाबतची मागणी सामाजिक कार्यकर्ते हेमंत मराठे यांनी केली होती.त्यानुसार या कामाला सुरुवात झाल्यामुळे त्यांच्या मागणीला यश आले आहे.दरम्यान ज्या ठिकाणी रस्ता खराब झाला आहे,त्याठिकाणी हे डांबरीकरण करण्यात येत आहे.
सावंतवाडी-मळेवाड या मार्गावरील रस्ता बऱ्याच ठिकाणी खराब झाला असल्याने या मार्गावर डांबरीकरणचे काम फेब्रुवारी २०१९ ला मंजूर झाले होते.मात्र ठेकेदाराने कामाला सुरुवात केली नव्हती.या कामाला डिसेंबरमध्ये सुरुवात होणे गरजेचे होते.मात्र तसेही झाले नाही.यामुळे हेमंत मराठे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई यांना भेटून काम सुरू करण्याबाबत उपोषण छेडण्याबाबत निवेदन दिले.यानंतर बुर्डी पुलाकडून डांबरीकरण कामाला सुरुवात करण्यात आली.यानंतर पुन्हा काही दिवस काम बंद ठेवले.याच दरम्यान लॉकडाऊन झाल्यामुळे काम करता येत नसल्याचे कारण अधिकारी व ठेकेदार सांगत होते.लॉकडाऊन सुरू असताना महत्त्वाची कामे करण्यास शासनाने मंजुरी दिल्याने या मार्गावरील डांबरीकरण काम सुरू करा,अशी मागणी कार्यकारी अभियंता युवराज देसाई यांना करत काम सुरू न केल्यास पुन्हा उपोषण छेडण्याचा इशारा दिला.त्याचदरम्यान मराठे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क करून रस्त्याच्या दुरावस्थेबाबत माहिती दिली.यावेळी आपण हे काम तात्काळ सूरु करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देतो,असे सांगितले. त्यानंतर या कामाला दोन दिवसांपूर्वी सुरू केले असून सद्यस्थितीत ज्याठिकाणी रस्ता खराब झाला आहे. त्याठिकाणी डांबरीकरण केले जाईल,असे कार्यकारी अभियंता देसाई यांनी सांगितले.दरम्यान काम सुरू झाल्याबद्दल हेमंत मराठे यांनी पालकमंत्री उदय सामंत कार्यकारी,अभियंता देसाई यांचे आभार मानले आहेत.