पारंपरिक मच्छीमारांची नाराजी…
मालवण, ता. १३ : एलईडी दिव्यांच्या साह्याने होणाऱ्या बेकायदेशीर पर्ससीन नेट मासेमारीप्रश्नी आमदार वैभव नाईक यांच्याकडूनही पारंपरिक मच्छीमारांची निराशा झाली असल्याचा आरोप पारंपरिक मच्छीमार महेंद्र पराडकर यांनी केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मालवण दौऱ्यावर आले असता मालवण बंदर जेटी येथे मत्स्य दुष्काळग्रस्त पारंपरिक मच्छीमारांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली होती. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी पारंपरिक मच्छीमारांच्या प्रश्नांसंदर्भात वैभव नाईक यांच्या संपर्कात रहा, असे आवाहन मच्छीमार शिष्टमंडळाला केले होते. त्यानुसार पारंपरिक मच्छीमार सातत्याने वैभव नाईक यांच्यामार्फत मत्स्य दुष्काळप्रश्नी पाठपुरावा करीत राहिले आहेत. मंगळवारी सायंकाळी साडे सात वाजताच्या सुमारास देवबाग, तारकर्ली, वायरी, दांडी येथील पारंपरिक मच्छीमारांना किनाऱ्यावरून एलईडी दिव्यांचा प्रकाशझोत दिसू लागला तेव्हा पारंपरिक मच्छीमारांच्या वतीने श्री. पराडकर यांनी आमदार वैभव नाईक यांना संपर्क करून दिसणारा प्रकाशझोत हा राज्याच्या सागरी हद्दीतीलच आहे असे कळविले. त्यामुळे एलईडी ट्रॉलर आज तरी पकडले जातील अशी अपेक्षा होती. मत्स्य विभागाची गस्ती नौका रात्री ९.३० वाजताच्या सुमारास गस्तीलाही गेली. परंतु गस्ती नौका रिकाम्या हातानेच परतली. मत्स्य अधिकाऱ्यांचे म्हणणे होते की एलईडी मासेमारी १२ सागरी मैलापलिकडे राष्ट्रीय हद्दीत सुरू होती. परंतु किनाऱ्यावरून दिसलेला प्रकाशझोत हा १२ सागरी मैलापलिकडील नव्हताच, असे पारंपरिक मच्छीमारांचे म्हणणे आहे असे आपण आज वैभव नाईक यांची शिवसेना कार्यालयात भेट घेऊन त्यांना कळविले. शिवाय पारंपरिक मच्छीमारांना मत्स्य दुष्काळाच्या खाईत लोटणारी एलईडी मासेमारी बंद कधी होणार असा सवालही त्यांना केला.
श्री. पराडकर म्हणाले, आमदार नाईक यांनी आपणास मत्स्य विभागाचे वरीष्ठ अधिकारी श्री. जाधव यांच्याशीही मोबाईलद्वारे संपर्क करून दिला. त्यांना आपण एलईडी मासेमारीत संदर्भात माहिती दिली. परंतु अधिकाऱ्यांशी चर्चा करून तेच तेच गाऱ्हाणे मांडण्यात पारंपरिक मच्छीमारांना आता रस राहिलेला नाही. बेकायदेशीर एलईडी मासेमारीप्रकरणी पारंपरिक मच्छीमारांना आता ठोस कारवाई अपेक्षित आहे हे आमदारांनी लक्षात घेतले पाहिजे. विधानसभा निवडणूक काळात दिलेल्या वचनांची पूर्तता करून दाखवली पाहिजे, असे श्री. पराडकर म्हणाले.