पोलिसांना मारहाण करणारे नगराध्यक्ष दीड महिना होते कुठे..?

922
2

रुपेश नार्वेकरांचा सवाल; संदेश पारकरांवर केलेल्या टीकेचा समाचार

कणकवली,ता.३० : कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या पोलिसांना मारहाण करणारे कणकवलीचे नगराध्यक्ष दीड महिन्यांनी उगवले असून, त्यांनी आल्या आल्या संदेश पारकर यांच्यावर टीका करण्याचे पहिले काम केले आहे. त्यामुळे गेले दीड महिना ते कुठल्या बिळात दडून बसले होते ? असा सवाल नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी केला आहे.
श्री नार्वेकर यांनी आज नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी शिवसेना नेते संदेश पारकर यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेतला. ते म्हणाले,
विद्यमान नगराध्यक्षांची कारकीर्द हा कणकवलीच्या लौकिकावर लागलेला कलंक आहे. आजपर्यंत कणकवलीच्या प्रमुखपदावर असलेल्या कोणत्याही नेत्याला फरार व्हावे लागले नव्हते. विद्यमान नगराध्यक्षांनी तो पराक्रम करून दाखवला. जनतेच्या हितासाठी त्यांनी कुणाची कॉलर धरली असती तर आम्हाला कौतुक वाटले असते. पण कोरोना कोरोना करून जे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्या नगराध्यक्षांनी लोकांची सेवा जीवावर उदार होऊन करणाऱ्या कोव्हीड योद्ध्यांना मारहाण केली. हे कोणते मोठे पुण्यकर्म आहे ? याचा खुलासा करावा.
नार्वेकर म्हणाले, गेले दोन महिने संदेश पारकर लोकांबरोबर आहेत. शहराच्या विकासाच्या योजना आणीत आहेत. त्यासाठी सरकारदरबारी पाठपुरावा करीत आहेत. त्यांच्या कामाला नगराध्यक्षांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. कारण पारकर हे सध्या लोकप्रतिनिधी नाहीत. मात्र नगराध्यक्ष म्हणून तुम्ही काय काय दिवे लावलेत ते सांगणार आहात का ?
गेले दोन महिने आमचे शहर निर्नायकी आहे. राज्य सरकारने कोरोनासंदर्भात जे निर्देश घालून दिले आहेत, त्याप्रमाणे कारभार सुरु आहे. त्यात नगराध्यक्षांची मर्दुमकी काय ? नगराध्यक्ष आणखी वर्षभर असेच दडून बसले असते तरी कारभार चाललाच असता.
शहरावर सध्या जे संकट निर्माण झाले आहे, ते कुणामुळे हे जनतेला ठाऊक आहे. नगराध्यक्ष तोंड फाटेपर्यंत ज्यांची वकिली करीत आहेत त्या आमदारांच्या कर्मचाऱ्यांमुळे शहर बंद आहे. त्यासाठी नगराध्यक्ष जबाबदार लोकांना जाब विचारणार आहेत का ? की खाल्ल्या मिठाला जागून गप्प बसणार आहेत ? याचेही स्पष्टीकरण त्यांनी द्यावे.
विद्यमान सत्ताधाऱ्यांनी ऐन संकटाच्या काळात शहरात धुमाकूळ घातला आहे. नेत्यांच्या लौकिकाला साजेल, असा योजना बंद करण्याचा एककलमी उपक्रम सुरु आहे. सॅनिटेशन मशीन आणले, ते बंद पडले. कमळ थाळीला पंधरा दिवसांत कुलूप लागले, बेसिनवर खर्च केला, ते बंद पडले हे नगराध्यक्षाना माहिती आहे काय ?
ऐन कोरोनाच्या काळात डॉक्टर आणि पोलिसांच्या इतकेच सफाई कर्मचाऱ्यांचे काम महत्वाचे आहे. ते सुद्धा कोव्हीड योद्धे आहेत. मात्र त्यांचा पगार दोन महिने झालेला नाही. नगर पंचायतीने ठेकेदाराचे लाखो रुपये अदा केले आहेत, मात्र गरज होती तेव्हा कर्मचाऱ्यांना ठेकेदाराने वेतन दिलेले नाही. वेतनासाठी त्यांना आंदोलन करावे लागलेले आहे. अशा मुजोर ठेकेदारावर कारवाई करण्याऐवजी त्याच्यासोबत केबिनमध्ये सेटलमेंट करण्यात आली. नगराध्यक्ष म्हणून त्याची तुम्हाला लाज वाटत नाही का ?
असेही नार्वेकर म्हणाले

4