परशुराम उपरकर ; मनसेतर्फे न्यायालयात दाद मागणार…
कणकवली,ता. १३: सिंधुदुर्गातील मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. ही बाब महामार्ग प्राधिकरण आणि हायवे ठेकेदार यांच्या लक्षात आणून देखील हायवेचे काम धोकादायक आणि निकृष्ट दर्जाचे होत आहे. त्यामुळे याविरोधात मनसेतर्फे न्यायालयात धाव घेणार आहोत अशी माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आज दिली.
येथील मनसे संपर्क कार्यालयात श्री.उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, खारेपाटण पासून झाराप पर्यंत हायवे ठेकेदाराने नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत बंद केले आहेत. त्यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण होत असून शेतकर्यांच्या भातशेतीचीही नुकसानी होत आहे. तसेच घरांमध्ये पाणी जाऊन वर्षभराचे धान्य, कपडे आणि इतर चीजवस्तूंची नुकसान होत आहे. हायवे ठेकेदाराचे निकृष्ट काम आणि या प्रकाराकडे महामार्ग प्राधिकरणाचे होणारे दुर्लक्ष यामुळे महामार्ग लगतचे शेतकरी आणि रहीवाशांना दरवर्षी लाखोंच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
श्री.उपरकर म्हणाले, सिंधुदुर्गात महामार्ग चौपदरीकरणाचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे हायवे ठेकेदार शासनाकडून कामाची बिले मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र हायवे ठेकेदाराने निकृष्ट कामे करून पादचार्यांसह वाहन चालकांचाही जीव धोक्यात आणला आहे. त्यामुळे चौपदरीकरणाच्या निकृष्ट कामाबात मनसेतर्फे न्यायालयात धाव घेतली जाणार आहे.