संजू परब यांची माहीती; अग्निशमन प्रकल्पाचे लवकर भूमिपूजन…
सावंतवाडी,ता.१३: शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या अडीच एकर व कचरा प्रकल्पाच्या पंचवीस गुंठे जागेत अशा दोन ठिकाणी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातुन शंभर कोटी रुपयांचा नवा प्रोजेक्ट उभारण्यात येणार आहे, या ठिकाणी भाजी मार्केटसाठी आलेले पाच कोटी रुपये कोरोनामुळे परत गेल्याने व भविष्यात ते मिळणे कठिण असल्याने आम्ही हा निर्णय घेतला असुन येत्या वर्षभरात हा प्रोजेक्ट सुरु होणार असल्याचे नगराध्यक्ष संजू परब यांनी सांगितले.
नगराध्यक्ष संजू परब यांनी पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते, यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक आनंद नेवगी, निशांत तोरस्कर, केतन आजगावकर, अमित परब, बंटि पुरोहित आदी उपस्थित होते.
नगराध्यक्ष श्री.परब म्हणाले, मुंबई पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर अत्यंत अद्ययावत अशा पद्धतीने हे दोन्ही प्रकल्प होणार असून त्यासाठी माजी खासदार निलेश राणे यांनी संपूर्ण सहकार्य तसेच मुंबईतील एक चांगला आर्किटेक देण्याची हमी त्यांनी दिलेला असून त्यासाठी आपण नगराध्यक्ष या नात्याने त्यांचे आभार मानतो. हे दोन्ही प्रकल्प होत असताना सध्या त्या ठिकाणी जे स्थानिक व्यापारी व विक्रेते आहेत त्यांची योग्य व्यवस्था आम्ही करणार असून कोणालाही उघड्यावर टाकणार नाही. सर्वाना विश्वासात घेऊन व न दुखवता हा प्रोजेक्ट उभा केला जाणार आहे. हे दोन्ही प्रोजेक्ट शहराच्या सौंदर्यात भर घालणार आहेत. तर कोरोना कालावधी संपताच शहरात अग्निशमन प्रकल्पाचे भूमिपूजन ही केले जाणार आहे.
नगराध्यक्ष श्री. परब पुढे म्हणाले, शहरातील अंडरग्राॅऊड वीज वाहीन्यासाठी आलेले ११ कोटी रुपये परत गेले आहे. यासाठी आम्ही उपोषणही केले, सदरचे पैसे परत मिळावे याकरिता पालकमंत्र्यांनी प्रयत्न करावे. लवकरच बायोगॅस प्रकल्पासोबत अंडरग्राॅऊड गॅस प्रकल्पही शहरात सुरु करणार येणार आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सापडलेला रुग्ण हा खरा कोरोना योद्धा असून त्याच्या कार्याला आमचा सलाम आहे, कोरोनासाठी स्वॅब तपासणी प्रयोगशाळेत कार्य करीत असताना त्याला ही बाधा झाली असली तरीही इतरांसाठी लढाई लढताना तो बाधित झाला आहे. त्यामुळे आम्ही त्याच्या पूर्ण पाठीशी असून तो लवकरच बरा होऊन पुन्हा आपल्या कामावर रुजू होईल, शहरात पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आला म्हणून नागरिकांनी घाबरुन नये, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उत्तम पाटील यांनी त्वरित उर्वरित कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन केले असून सदरचा परिसरही सॅनिटाईज करण्यात आला आहे. प्रत्येकाने प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
आगामी गणेशोत्सव सणासाठी बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेता पालिकेकडून नियोजन करण्यात आले असुन नारायण मंदिर पासून ते रामेश्वर प्लाझा पर्यंत फुटपाथवर ग्रामीण भागातून येणार्रा विक्रेत्यांची व्यवस्था केली जाणार आहे. सकाळी ७ ते संध्याकाळी ७.३० पर्यंत हा बाजार चालणार आहे. त्यानंतर स्वच्छतेसाठी वेळ ठेवण्यात आला असून पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता बाजार सुरू होणार आहे. गणेशोत्सव कालावधीत अकरा दिवसांसाठी हे नियोजन राहणार असुन या काळात शहरातील बाजारपेठेतील वाहतुक बंद ठेवण्यात येणार आहे तर एसटी वाहतुक राजवाड्यामार्गे सुरु राहणार आहे.