ग्रामस्थांचा धोकादायक मार्गावरून प्रवास; प्रशासनाने दखल घेण्याची मागणी
बांदा,ता.१२:
तालुक्यातील रोणापाल-आंब्याचे गाळूकडे जाणाऱ्या मार्गावरील मोरीपूलाचा भराव सतत दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वाहून गेला आहे.
परिणामी ग्रामस्थांना मुख्य रस्त्यावर येण्यासाठी सुमारे सहा तास प्रतीक्षा करावी लागली. सुदैवाने या पुरात कोणतीही जीवीतहानी झाली नसली तरी निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्यानेच हा नवीन मोरीपूल वाहून गेल्याचे उपस्थित संतप्त ग्रामस्थांनी सांगितले.
गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे मडुरा पंचक्रोशीतील नदी, नाले वाहू लागले आहेत. रोणापाल-आंब्याचे गाळू येथे आमदार निधीतून लाखो रुपयांचा निधी खर्च करून मातीच्या भरावाच्या आधारे मोरीपूल बांधण्यात आले. सहा महिन्यांचा कालावधी सुद्धा पूर्ण न होता नियोजनशुन्य कामामुळे मोरीपूल पावासाच्या पुरात वाहून गेल्याचे उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले.
बांधकामावेळी ग्रामस्थांनी सदर माती वाहून जाणार असल्याचे ठेकेदार व प्रशासनास सांगितले होते. परंतु पुलाला कोणताही धोका नसल्याची दिलेली हमी मात्र आज पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याचे माजी सरपंच प्रकाश गावडे यांनी सांगितले. वाहून गेलेल्या पुलाची उपसरपंच पप्या केणी, तलाठी बी.शिंदे, ग्रामसेवक चंद्रकांत शेडगे, तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष बाबल तुयेकर तसेच शिवा नाईक, सदानंद नाईक आदी ग्रामस्थांनी पाहणी केली. सद्यस्थितीत सदर मार्ग धोकादायक बनल्याने तात्पुरत्या स्वरुपात तरी प्रशासनाने व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
दरम्यान, सरपंच सुरेश गावडे यांच्याशी संपर्क साधला असता प्रत्यक्ष येण्याची इच्छा खुप होती परंतु कॉरंटाईन असल्यामुळे येता आले नाही. मात्र, ग्रामस्थांची झालेली अडचण पाहून आपल्या जीव्हारी लागल्याचे त्यांनी सांगितले. पुलासंबंधीत अद्याप कुणीही दखल न घेतल्याने घरी बसून सर्व यंत्रणा घटनास्थळी पाठवली असून सदर कामाची चौकशी लावणार असल्याचेही सुरेश गावडे यांनी सांगितले.