ओरोस येथे कारवाई;नऊ लाख ९३ हजार चा मुद्देमाल जप्त…
ओरोस ता १३: राज्य उत्पादन शुक्ल विभागाच्या ओरोस भरारी पथकाने मुंबई गोवा महामार्गावर ओरोस खर्ये वाडी येथे रात्री (रविवार १२ जुलै) गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतूकिवर केलेल्या कारवाईत ९ लाख ९३ हजार ६०० रूपयांच्या अवैध दारू सह एकूण २१ लाख ९३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर बिगरपरवाना गोवा बनावटीची अवैधरित्या वाहतूक केल्या प्रकरणी नारायण भगवान गिरी (३८) रा. कोलगांव, सावंतवाड़ी याला ताब्यात घेण्यात आले आहे.
मुंबई गोवा महामार्गावरून अवैध गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोल्हापुर उपायुक्त व सिंधुदुर्ग जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ओरोस येथील भरारी पथकाचे निरीक्षक एस के दळवी, दुय्यम निरीक्षक डी एम वायदंडे, यू एस थोरात, ए के जगताप, जवान आर. डी. ठाकुुुुर, दिपक वायदंडे, पी एस माळी, आर एस शिंदे यांच्या टीमने रवीवारी रात्रीपासून ओरोस खर्येवाड़ी येथे महामार्गावर सापळारचला होता. त्यानुसार रात्री या पथकाने ओरोस खर्येवाडी येथे हॉटेल पॅपीलॉन समोर महामार्गावर स्वराज माझदा कंपनीच्या सहा चाकी टेंपो (एम.एच. ०७ ए जे १५३०) या टेम्पोला या पथकाने थांबण्याचा ईशारा करत हा टेम्पो गाडी तपासला असता आतमध्ये ७ लाख ५८ हजार ४०० रूपये किंमतीचे गोवा बनावटी गोल्डन एस ब्ल्यू फ़ाईन व्हिस्की चे १५८ बॉक्स, १ लाख ८७ हजार २०० रूपये किमतीचे गोल्डन ब्लॅक थ्री एक्स रमचे ३९ बॉक्स, ४८ हजार रूपये किंमतीचे गोल्डन एस ब्ल्यू फ़ाईनचे १० बॉक्स असे एकूण ९ लाख ९३ हजार ६०० रूपये किमतीचे अवैध गोवा बनावटी दारूचे २०७ बॉक्स आढळून आले. त्यामुळे ही गोवा बनावटीची अवैध दारू आणि अवैध दारू वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेला १२ लाखाचा स्वराज माझदा कंपनीच्या सहा चाकी टेंपो असा एकूण २१ लाख ९३ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच गोवा बनावटीची बिगर परवाना अवैध दारू वाहतूक केल्या प्रकरणी टेम्पो चालक नारायण भगवान गिरी (३८) रा. कोलगांव, सावंतवाड़ी याला ताब्यात घेण्यात आले आहे.