माहितीच्या अधिकारात उघड; सर्व्हरमधील तारखेत सुध्दा घोळ…
कणकवली,ता.१४: जिल्हा रुग्णालयात बसविण्यात आलेल्या सीसीटिव्ही यंत्रणेतील १६ कॅमेर्यापैकी फक्त पाच कॅमेरे चालू असल्याचे तसेच त्या ठिकाणी असलेल्या सर्व्हरमध्ये १९७० सालातील तारीख असल्याचे माहितीच्या अधिकारात निष्पन्न झाले आहे. दरम्यान एखाद्या वैदयकीय अधिकार्याला मारहाण झाल्यास किंवा मुंबई सारखे मुले पळवून नेण्यासारखा प्रकार झाल्यास याचा शोध जिल्हा शल्य चिकीत्सक आणि संबधित यंत्रणा कसा काय लावणार?, असा सवाल मनसेकडुन करण्यात आला आहे.
याबाबतची माहीती मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दया मेस्त्री यांनी दिली आहे. त्यांनी माहीतीच्या अधिकारात जिल्हा शल्य चिकीत्सक धनंजय चाकूरकर यांचा कार्यालयात जाण्या-येण्याची माहीती मिळविण्यासाठी फुटेज मागितले होते. त्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. दरम्यान फुटेज देण्यासाठी एक टिबी हार्ड डीस्क आणि ३हजार ९९० रुपये तसेच ऑपरेटरची फी १ हजार रुपये किंवा ४ हजार ९९० रुपये द्यावे लागतील, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे एकीकडे कोरोनाच्या काळात चढ्या दराने विविध साहीत्याची खरेदी करणार्या या रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार आहे, असा आरोप श्री.मेस्त्री यांनी केला आहे.