नितेश राणे; निगेटिव्ह अहवाल घेवून येणा-यांना थेट प्रवेश द्या..
सावंतवाडी ता १४: चतुर्थीच्या काळात कोकणात येणा-या चाकरमान्यांची मोफत कोविड टेस्ट करण्यात यावी,अशी मागणी आपण मुख्यमंत्री तसेच जिल्हाधिका-यांकडे मागणी केली आहे.गणेश चतुर्थी हा भावनिक विषय असल्याने याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी,अशी माहीती आमदार नितेश राणे यांनी आज येथे दिली.दरम्यान चाकरमान्यांनी चतुर्थीच्या काळात येताना कोवीड चाचणीचा ४८ तासातील निगेटीव्ह अहवाल घेवून आल्यास त्यांना याठिकाणी फीरण्याची परवानगी द्यावी,अशीही मागणी आपण केल्याचे त्यांनी सांगितले.आज येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री राणे पुढे म्हणाले, राज्य सरकारने आतापर्यंत कोकणातील चाकरमान्यांची फक्त फसवणूकच केली आहे.राज्याबाहेरील कामगारांना त्यांनी मोफत त्यांच्या मूळ ठिकाणी सोडले,तर कोकणातील चाकरमान्यांना गावी सोडण्यासाठी मोफत एसटी बस सेवा देऊ ,असे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात आले,मात्र ते आश्वासनच राहिले.त्यामुळे गणेश चतुर्थी हा कोकणातील लोकांचा भावनिक सण आहे.या मागण्यांबाबत राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन गणेश चतुर्थीसाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना त्यांच्या गावी पाठवावे,त्यासाठी लागणारे कोविड तपासणी अहवाल हे त्यांना त्या ठिकाणी मोफत उपलब्ध करून द्यावेत,तसेच जिल्ह्याच्या तपासणी नाक्यावर त्यांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह असल्यास थेट प्रवेश द्यावा, व निगेटिव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींना क्वारंटाईनची सक्ती न करता फिरण्याची मुभा द्यावी,अशा विविध मागण्या त्यांनी आपण राज्य सरकारकडे केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.